पारा ४३.६ अंशांवर : २६ एप्रिल १९५८ रोजी होते इतकेच तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:31 PM2019-04-27T23:31:47+5:302019-04-27T23:34:30+5:30
शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, शनिवारी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला.
औरंगाबाद : शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, शनिवारी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला.
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी काही दिवस तापमानाने चाळिशी पार केली होती. त्यानंतर अवक ाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. २३ एप्रिलपासून शहराच्या कमाल आणि किमान तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपारी उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतरही वातावरणात प्रचंड उकाडा कायम राहत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
या मोसमामध्ये शहरात ४ एप्रिल रोजी तापमान ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यानंतर तापमान ४० अंशाजवळ कायम होते. मात्र, १६ एप्रिल रोजी शहरातील तापमानात ७ अंशांची घसरण झाली आणि ४२ अंशांवर गेलेला पारा मंगळवारी थेट ३४.८ अंशांपर्यंत घसरला; परंतु चार दिवसांपासून तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, शनिवारी कमाल तापमान ४३.६ अंशांवर गेले, तर किमान तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही मोठी वाढ झाली असून, उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.
यापूर्वी असे राहिले तापमान
शहरात यापूर्वी २६ एप्रिल १९५८ मध्ये ४३.६ अंश तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर १७ एप्रिल २०१० रोजी ४३.५ अंश तापमान होते. त्यानंतर बहुतांश वर्षी एप्रिलमध्ये तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांदरम्यान राहिला. मात्र, १९५८ नंतर पुन्हा एकदा शनिवारी तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर गेला.