१०८३ मंडळांकडून गणरायास निरोप
By Admin | Published: September 9, 2014 11:48 PM2014-09-09T23:48:00+5:302014-09-09T23:55:33+5:30
हिंगोली : जिल्ह्यात अनंत चतुर्र्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनाची परवानगी दिल्यामुळे सोमवारी मोजक्या १३ मूर्ती वगळता १०८३ मंडळांनी गणरांना भावपूर्ण निरोप दिला.
हिंगोली : जिल्ह्यात अनंत चतुर्र्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनाची परवानगी दिल्यामुळे सोमवारी मोजक्या १३ मूर्ती वगळता १०८३ मंडळांनी गणरांना भावपूर्ण निरोप दिला. प्रामुख्याने डीजे वाजवण्याला बंदी घातल्यामुळे भक्तांच्या आंदोत्सवावर विरजन पडले. प्रतिवर्षी अगदी थाटामाटात होणारे विसर्जन यंदा बॅण्डच्या निनादात करावे लागले.
जिल्ह्यात १०८६ मंडळांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मुळात गणरायाच पाऊस घेऊन आल्याने बहूतांश मंडळांना सजावट करता आली नाही. जिल्ह्यावरही दुष्काळाचे सावट असल्याने देखावा करण्याकडे मंडळांचा कल नव्हता. अनंत चतुर्र्दशीच्यापर्यंत ही अवस्था राहिल्याचे सोमवारी दिसून आले. सकाळपासून पदाधिकाऱ्यांची घाई सुरू होती. सुरूवातील सर्वच मंडळांनी महाप्रसदाचे आयोजन केले होते. दुपारी पूजा, आरती करून सवाद्य मिरवणुकीला सुरूवात झाली. पर्यायाअभावी सर्वच मंडळांना बॅण्डचा आधार घ्यावा लागला. परिणामी कधी नाही ते यंदा वाजंत्र्यांचे फावले. दरवाढ मोठ्या प्रमाणात सहन करावी लागली असताना काही मंडळांना ढोलची गर्जना ऐकावयास मिळाली नाही. डीजे नसल्यामुळे भक्तांना आनंद द्विगुणित करता आला नाही. दबक्या आवाजात कार्यकर्ते यंदा उत्साह वाटत नसल्याचे बोलत होते. हिंगोलीत सायंकाळी मिरवणुकीला वेग आला. जवळपास सर्वच मंडळे महात्मा गांधी चौकात आल्यामुळे थोडी गर्दी दिसून आली. पारंपरिक देखाव्यासह श्री बाल शेतकरी गणेश मंडळाने मिरवणूक काढली. वंजारवाडा येथील पोळा मारोती येथून मिरवणुकीला सुरूवात झाली. महात्मा गांधी चौकातून परत वंजारवाडा मार्गेे कयाधू नदीत विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अग्निशमन दलाचे बंब आणि दोन रूग्णवाहिकाही होत्या. (प्रतिनिधी)
विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी रांगा
जिल्ह्यातील १३ मंडळांनी मंगळवारी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषात मिरवणुका काढल्या. प्रामुख्याने हिंगोलीतील प्रमुख १३ मंडळांचा त्यात समावेश होता. कळमनुरी २, औंढा १, कुरूंदा १, हट्टा १, गोरेगाव २ मंडळांन मंगळवारी निरोप दिला. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हिंगोलीतील गड्डेपीर गल्लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणेश मंदिरात अगदी सकाळपासून भाविकांच्या रांगा पहावयास मिळाल्या. परजिल्ह्यातून आलेल्या भाविकांची संख्या अधिक असल्याने गांधी चौकापासून रांगा लागल्या होत्या. सायंकाळपासून हळूहळू गर्दी कमी होत गेली. भाविकांसाठी जागोजागी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था केली होती. सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिकेट्स लावले होते. सीसीटीव्हीची नजरही भक्तांवर होती. रेल्वे व बसस्थानकातून गांधी चौकापर्यंत आॅटोद्वारे आणण्याची मोफत व्यवस्था केली होती. पदाधिकारी, स्वंयसेवक, कार्यकर्ते व्यवस्थेसाठी झटत होते.
शिवनी खु. येथील सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशोत्सवात बाल कीर्तनकार रवी महाराज यांनी पर्यावरणावर कीर्तन केले. वसंतराव ढेंगळे यांनी प्रवचन केले. उत्सवाचा समारोप हभप ज्ञानेशनाथ महाराज यांच्या कीर्तनाने झाला. युवकांनी ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा आदीवर जनजागृती केली. यावेळी साहेबराव जाधव, जयाती पाईकराव, कृषी सहाय्यक कोरे, कांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पांडुरंग सुळे तर सुत्रसंचालन गंगाधर सूर्यवंशी यांनी केले. बालाजी जाधव यांनी आभार मानले
कळमनुरी : शहर व परिसरात ८ आॅगस्ट रोजी ९४ गणेश मूर्तीचे ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत शांततेत विसर्जन करण्यात आले. शहरातील १८ मंडळाचे ८ आॅगस्ट रोजी तर एक गणपतीचे विसर्जन ९ रोजी झाले. माजी आ. गजानन घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रकांत देशमुख, संजय काब्दे, सखाराम उबाळे, संतोष सारडा, अरविंद पाटील, नामदेव कऱ्हाळे, संदीप गाभणे, दिलीप खोडके, विनोद बांगर, बबलू पत्की, बाळू पाटील, कांता पाटील, सोनबा बुरसे, उत्तम शिंदे उपस्थिती होती.