संशयाचा फायदा भेटला; मुलाच्या खुनाच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 12:16 PM2021-09-06T12:16:24+5:302021-09-06T12:26:32+5:30
वरूडकाजी येथील विजय कौतिक मिरगे हा त्याचे वडील कौतिक रायभान मिरगे यांस जमीन नावावर करून मागत असे.
औरंगाबाद : मुलगा जमीन नावावर करून मागत असल्याचा राग धरून फावड्याच्या दांड्याने डोक्यात मारून मुलाचा खून केला. या आरोपातून सत्र न्यायाधीश निंबाळकर यांनी आरोपी वडिलांची निर्दोष मुक्तता केली.
वरूडकाजी येथील विजय कौतिक मिरगे हा त्याचे वडील कौतिक रायभान मिरगे यांस जमीन नावावर करून मागत असे. त्यामुळे दोघांत नेहमी भांडण होत असे. १ डिसेंबर २०१८ रोजी संध्याकाळी बाप-लेकात भांडण झाले. त्यावेळेस कौतिक मिरगे याने मुलगा विजय यांस फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण केली. विजयला सिल्लोड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी औरंगाबादला घाटी दवाखान्यात पाठविले. उपचारादरम्यान विजयचे ५ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले. मयताची आई अनिताबाई कौतिक मिरगे हिने दुसऱ्या दिवशी सिल्लोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान कौतिकने रक्ताने भरलेला फावड्याचा दांडा काढून दिला होता.
सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीची बायको व नातू प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन आरोपीस निर्दोष मुक्त केले. आरोपीतर्फे ॲड. के.जी .भोसले यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. एस.के. भोसले, ॲड. के.एन. पवार व ॲड. अदिती कुलकर्णी यांनी साहाय्य केले.