मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 07:38 PM2024-10-04T19:38:35+5:302024-10-04T19:38:58+5:30

छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी मद्यपींची कारमध्येच ‘बैठक’; वेगासोबत अपघातांचा आलेख वाढता

Metro City's 'car-o-bar' trend is gaining momentum in Chhatrapati Sambhajinagar, alcohol is being served in cars | मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग

मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन आठवड्यांमध्ये ‘हिट अँड रन’च्या सलग चार घटनांनी सामान्यांच्या मनात धडकी भरली आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी सुसाट गाड्या पळवणाऱ्यांपासून भविष्यात गंभीर नुकसान होऊ शकते. यास शहरात वाढत असलेला ‘कार-ओ-बार’ ट्रेंड कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. बार, रेस्टॉरंटपेक्षा कारमध्ये बसून दारू पिण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्यावर कारवाई किंवा नियंत्रण ठेवायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एपीआय कॉर्नरला मद्यधुंद कारचालकाने रविवारी दुपारी तीन गाड्यांना ठोकले. आठ दिवसांमध्ये ‘हिट ॲण्ड रन’ची तिसरी घटना असताना सोमवारी सायंकाळी सुसाट स्कॉर्पिओ चालक होलिक्रॉस स्कूल ते नगर नाक्यापर्यंत ५ वाहनांना उडवत गेला. एकीकडे बेजबाबदार वाहनचालकांची संख्या वाढत असतानाच भरदिवसा दारू रिचवून गाड्या पळवण्याचे प्रमाणही वाढत आहेत. अपघातातील बहुतांश वाहनांत दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे उघड्यावरच भरणाऱ्या ‘मद्यपींच्या बैठकां’चा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

काय आहे ‘कार-ओ-बार’ ट्रेंड ?
कारमध्येच बसून दारू पिण्याला तरुणांमध्ये ‘कार-ओ-बार’ म्हटले जाते. तरुणांसह आता ३५ ते ६० वयोगटातील अनेक मद्यपी रात्री रस्त्याच्या कडेला, ढाब्याबाहेर, निर्मनुष्य परिसर, औद्योगिक वसाहतींमध्ये कार उभी करतात. कारमध्ये किंवा कारवर ग्लास ठेवून बैठका रंगवल्या जातात. अनेकदा बारमधील वाढीव दर नको म्हणून मद्यपी हा मार्ग अवलंबतात. शिवाय, अल्पवयीनांना बारमध्ये प्रवेश निषिद्ध असल्याने अनेक अल्पवयीन हाच ट्रेंड फॉलो करतात.

या भागात वाढले प्रकार
शहरात रामगिरी ते सिडको चौक, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहत, केंब्रिज चौक, बीड बायपास, झाल्टा फाटा, उड्डाणपुलाखालील जागा, सोलापूर-धुळे महामार्ग, पैठण रोड ते लिंक रोड, सर्व्हिस रोडवरवर सर्वाधिक मद्यपींच्या कार उभ्या आढळून येतात. अनेक ठिकाणी वाईन शॉपच्याच आजूबाजूला कार उभ्या करून दारू रिचवली जाते.

हे बेकायदेशीरच
भारतीय कायद्यानुसार रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई असल्याने कारमध्ये दारू सेवनही बेकायदेशीर मानले जाते. अशांना न्यायालयात हजर करून दंड ठोठावण्यात येतो. यात वाहन देखील जप्त केले जाते.

१६४ जणांवर कारवाई
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, गेल्या ८ महिन्यांत १६४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली. यात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १०७ वाहनचालकांना रंगेहाथ पकडले.

वेगासोबत अपघातांचा आलेख वाढता
महिना अपघात मृत्यू गंभीर जखमी
जानेवारी ४४ १४ ३७
फेब्रुवारी ४५ १७ २९
मार्च ५१ १९ ४३
एप्रिल ४९ १५             २५
मे ४८ १६             ४२
जून ४२ १४ २४
जुलै ५५ ११ ५१
ऑगस्ट ५७ १९ ४३

अवघ्या २१८ जणांवर वाहतूक विभागाची जबाबदारी
शहराची लोकसंख्या १६ लाख तर वाहने १३ लाखांच्या घरात आहेत. वाहतूक नियमाची जबाबदारी मात्र अवघ्या २१८ अंमलदारांवर आहे. यापैकी काही रजेवर गेल्यावर १७० जणांवरच जबाबदारी येऊन ठेपते. त्यामुळे नियमन करावे की कारवाया, असा प्रश्नही वाहतूक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.

Web Title: Metro City's 'car-o-bar' trend is gaining momentum in Chhatrapati Sambhajinagar, alcohol is being served in cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.