मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’

By विकास राऊत | Published: October 15, 2023 02:28 PM2023-10-15T14:28:12+5:302023-10-15T14:28:12+5:30

सोलापूर- धुळे महामार्गाच्या कामात तीन हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता, हा प्रकल्पही बारगळला

Metro-flyover project wrapped up; Nitin Gadkari clearly said, 'This project will not happen' | मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’

मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा शेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्प आता जवळपास गुंडाळल्यात जमा आहे. ‘हा प्रकल्प होणे नाही’, अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, ‘लोकमत’देखील गडकरी यांना या प्रकल्पांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. गडकरी एका समारंभासाठी शुक्रवारी शहरात होते.

२४ एप्रिल २०२२ रोजी गडकरी यांनीच या प्रकल्पांची घोषणा केली होती. महापालिका स्मार्ट सिटीने मेट्रो आणि उड्डाणपुलासाठी डीपीआरदेखील तयार केला; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआयने) याबाबत हात वर केले. असा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे मध्यंतरी पालिका स्मार्ट सिटी कार्यालयाला कळविले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. शहरातील काही उद्योजक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी गडकरी यांची भेट घेतली. मात्र, गडकरी यांच्याकडून नकारघंटा आल्याने त्यांचा हिरमोड झाला.

औट्रम घाटातील बोगदा बारगळला !
छत्रपती संभाजीनगर ते फर्दापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मंत्री गडकरी यांनी निधी दिला. सध्या त्या रस्त्याचेही २० टक्के काम बाकी आहे. संभाजीनगर ते पैठण या रस्त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. सोलापूर- धुळे महामार्गाच्या कामात तीन हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता. मात्र, वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे बोगद्याचा प्रस्ताव रद्द झाला. बोगद्याच्या पर्यायाचा दोन वर्षांपासून शोध सुरू आहे.

Web Title: Metro-flyover project wrapped up; Nitin Gadkari clearly said, 'This project will not happen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.