एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी गाजवले विधानभवन, चार पुरस्कारांवर बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:05 AM2021-01-21T04:05:46+5:302021-01-21T04:05:46+5:30
........................... औरंगाबाद : नुकतीच महाराष्ट्राच्या विधानभवनात अभिरूप युवा संसद पार पडली. युवक बिरादरी आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण ...
...........................
औरंगाबाद : नुकतीच महाराष्ट्राच्या विधानभवनात अभिरूप युवा संसद पार पडली. युवक बिरादरी आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, मुंबईच्या वतीने विधानभवनात राज्यस्तरीय अभिरूप युवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उत्कृष्ट संसदपटूंच्या एकूण पाच पुरस्कारांपैकी चार पुरस्कारांवर एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या विद्यार्थ्यांचा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १९) एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सत्कार करण्यात आला. विधानभवनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिरूप युवा संसदेचे एमजीएम सभागृहातही सादरीकरणही करण्यात आले. यावेळी एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, भाऊसाहेब राजळे, ‘एमजीएम’चे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव आशिष गाडेकर, आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत एमजीएमचा विद्यार्थी भागवत जुंबड, कोमल पारिक, अब्दुल्लाह अलमोहम्मदी आणि निशांत पवार यांना अनुक्रमे पाचपैकी सुरुवातीचे चार पुरस्कार प्राप्त झाले. त्यांच्यासह क्षितिजा तिडके, ऋत्विक बारी, वैष्णवी नाईक, यश साळुंके, विनय पांचाळ, सुधीर काकडे, अमोल डोईफोडे, गणेश म्हस्के, ओंकार पवार, सिद्धेश सुरसे, पूजा आहेर, अवलीन ढोडी, ऋषिकेश खंडाळे, वैष्णवी राऊत, सिद्धी महातोले, प्रतीक भामरे यांचाही मंगळवारी सत्कार करण्यात आला. डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक, प्रा. विवेक एम. राठोड यांनी सूत्रसंचालन केले; तर डॉ. आशा देशपांडे यांनी आभार मानले.
एमजीएमचा आशय येडगे ठरला ‘युवाभूषण’
युवक बिरादरीच्या वतीने युवाभूषण या अन्य एका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या २८०० स्पर्धकांमधून एमजीएम विद्यापीठाचा आशय दिलीप येडगे हा विद्यार्थी प्रथम आला. त्याला ५० हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र देऊन माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, मा. खासदार भालचंद्र मुणगेकर आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.