एमजीएम विद्यापीठाकडून अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लिट
By योगेश पायघन | Updated: November 24, 2022 15:46 IST2022-11-24T15:44:34+5:302022-11-24T15:46:29+5:30
एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबर रोजी पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.

एमजीएम विद्यापीठाकडून अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लिट
औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबर रोजी पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. या समारंभात विद्यापीठाकडून पहिली डी.लिट पदवी समाजसेवक, साहित्यिक, विचारवंत अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आली. त्यांच्या स्नुषा सावित्रीबाई मधुकर साठे ही पदवी स्वीकारतील, असे कुलपती अंकुशराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
एमजीएम विद्यापीठ २०१९ पासून कार्यान्वित झाले आहे. दहावीनंतर थेट अभियांत्रिकी शिक्षण देणारे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग टेक्नालॉजी, डिझाइनशी संबंधित संपूर्ण शिक्षणासाठी स्कूल ऑफ डिझाइनही येथे सुरू करण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे यांची विपुल साहित्यसंपदा आहे. त्यांचे सामाजिक कार्य आमच्यासाठी सदैव आदर्श असून, एमजीएम विद्यापीठाची पहिली डी.लिट पदवी प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो, अशी भावना कुलपती अंकुशराव कदम यांनी व्यक्त केली.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात रविवारी दीक्षांत सोहळा पार पडेल. पहिल्या दीक्षांत समारंभामध्ये एमजीएम विद्यापीठातून २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षांदरम्यान विविध अभ्यासक्रमांतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. यामध्ये पदवीधर १०९, पदव्युत्तर पदवीधर २९१, पदविकाधारक १३१ आणि प्रमाणपत्रधारक ३ विद्यार्थ्यांचा समावेश राहील. यापैकी १३६ बेसिक अँड अप्लाइड सायन्स, ६० इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी, २३० मॅनेजमेंट अँड कॉमर्स, १५ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ९३ सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विद्याशाखेचे विद्यार्थी असतील, असे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डाॅ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती.
चान्सलर्स गोल्ड मेडलचेही वितरण
या समारंभामध्ये विविध विद्या शाखांमधून २०२० ते २०२२ दरम्यान सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चान्सलर्स गोल्ड मेडल देऊन सन्मान केला जाणार आहे. पदवी प्रमाणपत्र खास कागदापासून तयार केले आहे. त्यात अनेक सुरक्षा फिचर्स आहेत, असे परीक्षा नियंत्रक डॉ. कर्नल प्रदीपकुमार यांनी सांगितले.