‘एमएच-५७’:वैजापूरची राज्यात आता नवी ओळख, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:14 PM2024-10-15T13:14:42+5:302024-10-15T13:18:04+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिसाला, शहरातील चकरा थांबणार
छत्रपती संभाजीनगर : तब्बल १८ लाखांवर वाहन संख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास सोमवारी शासन निर्णयद्वारे मान्यता देण्यात आली. ‘एमएच-५७’ अशी नवीन ओळख वैजापूरची आता राज्यभर असणार आहे. या नव्या कार्यालयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिलासा मिळणार असून, वाहनासंबंधी कामकाजासाठी शहरात माराव्या लागणाऱ्या चकरा थांबणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत बीड आणि जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. यात आता वैजापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील वाहनधारकांना लायसन्स काढायचे असो की अन्य काही कामकाज, त्यासाठी थेट शहर गाठावे लागते. परंतु, आता वैजापूरच्या माध्यमातून ग्रामीण भागातच वाहनासंबंधी कामकाजाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमएच-५७’ या नोंदणी क्रमांकासह वैजापूर येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे कार्यालय सुरू करण्यास सोमवारी मान्यता देण्यात आली. या कार्यालयासाठी शासकीय अथवा खाजगी मालकीची जागा भाडेतत्त्वार घेण्याची प्रक्रिया परिवहन आयुक्त कार्यालयाकडून केली जाणार आहे. तसेच एका इंटरसेप्टर वाहनासही मंजुरी देण्यात आली आहे.
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
‘लोकमत’ने ‘पीपल्स मॅनिफेस्टो’च्या माध्यमातून जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय का नाही, याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात २२ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. राज्यात लातूर, जळगाव याठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात येत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये या कार्यालयाची प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे समोर आणले. अखेर छत्रपती संभाजीनगरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळाले आहे.