आयुक्तांनी मागविली जलस्रोतांची सूक्ष्म माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:21 AM2019-06-04T00:21:41+5:302019-06-04T00:22:20+5:30
दुष्काळावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. आयुक्तांनी मराठवाड्यातील जलस्रोतांची सूक्ष्म माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जी. प. सीईओंना दिले आहेत.
औरंगाबाद : दुष्काळावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. आयुक्तांनी मराठवाड्यातील जलस्रोतांची सूक्ष्म माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जी. प. सीईओंना दिले आहेत.
गावनिहाय योजनांचे उद्भव, जीपीएस व फोटोसह देणे, नळ योजनांच्या विहिरींची खोली, तेथील खडकाच्या प्रकाराची माहिती देणे, उद्भवाच्या ५०० मीटर व १ किमी परिसरातील खासगी विहिरींची माहिती, विहिरीसभोवती असलेल्या जलसंधारणच्या योजना, त्यांच्या आवश्यक दुरुस्तीची कामे, नवीन प्रस्तावित कामे आदींची सविस्तर माहिती विभागीय आयुक्तांनी मागविली आहे.
गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक योजनांचे स्रोत एका ठिकाणी आणि जलसंधारणाची कामे इतर ठिकाणी होत आहेत. जलस्रोतांजवळच ही कामे करा. सार्वजनिक योजनांच्या उद्भवाच्या १ कि.मी. अंतरातील खासगी विहिरींचा उपसा तात्काळ थांबवा आणि त्यांच्यावर कारवाई, तसेच गावनिहाय स्रोतांचा जीपीएस लोकेशन फोटोसह अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
पाहणीत धक्कादायक माहिती
गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौºयावर होते. या दौºयात त्यांनी शहरांसह गावांतील पाणीपुरवठा योजनांची पाहणी करून माहिती घेतली. पाणीपुरवठ्यांच्या योजनांचे स्रोत का आटले, खुल्या स्रोतांवरील जलशुद्धीकरण यंत्र बंद का पडले, योजनांचे उद्भव एका ठिकाणी आणि पाणीपुरवठा दुसºया ठिकाणी, जलयुक्त शिवार, सीएसआर फंडातील कामे देखाव्यांसाठी केल्याची गंभीर बाब आयुक्तांच्या समोर आली.
-----------