मायक्रोसॉफ्ट गडबडले; विमाने रद्द झाल्याने पर्यटनासह विधी, व्यापार, उद्योग क्षेत्रास फटका
By सुमित डोळे | Published: July 20, 2024 11:54 AM2024-07-20T11:54:16+5:302024-07-20T11:57:00+5:30
शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला.
छत्रपती संभाजीनगर : मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बिघाडाचा जगभरात परिणाम झालेला असताना शहरातदेखील विमान पर्यटनाला मोठा फटका बसला. अनेक उद्याेजक, व्यापाऱ्यांसह वकिलांचे ठरवलेले नियोजन बिघडल्याने मनस्ताप सहन करावा लागला. याचा सर्वाधिक परिणाम इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांना बसून शुक्रवारच्या सायंकाळसह शनिवारच्या सकाळचे मुंबईचे उड्डाण रद्द करण्यात आल्याने अनेकांना नुकसानाचा फटका सहन करावा लागला.
शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. संगणक, लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन आल्याने बहुतांश देशांमधील व्यवहार ठप्प झाले. त्याचा थेट परिणाम शहरातील विमानसेवेवरदेखील झाला. सायंकाळी दिल्ली, हैदराबाद, अहमदाबादसाठी जाणाऱ्या प्रवाशांची माेठी गर्दी विमानतळावर होती. रोज घड्याळाच्या काट्यावर चालणारे विमानतळाचे कामकाज ठप्प झाल्याने धावपळ उडाली.
या विमानांवर सर्वाधिक परिणाम
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे अहमदाबादचे विमानाचे सुरळीत उड्डाण झाले. तर दिल्ली व हैदराबादसाठीच्या इंडिगो विमानाला एक तासाने विलंब झाला. एअर इंडियाचे दिल्लीचे विमानदेखील वेळेत होते.
इंडिगोच्या प्रवाशांच्या वाट्याला सर्वाधिक मनस्ताप
मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडाचा भारतात सर्वाधिक फटका इंडिगो एअरलाइन्स व क्रमाने त्यांच्या प्रवाशांना बसला. इंडिगोची शुक्रवारची सायंकाळची व मुंबईची सकाळची विमानाचे उड्डाण रद्द झाले. शिवाय, दिल्ली व हैदराबादच्या इंडिगोच्या प्रवाशांना एक तासापेक्षा अधिक विमानतळावर उड्डाणाची वाट पाहत बसावे लागले. परिणामी, पुढील सर्वच नियोजन हुकल्याने त्यांनीदेखील मनस्ताप व्यक्त केला. दरम्यान, अन्य कंपन्यांच्या सेवेवर तुलनेने कमी परिणाम झाला. याबाबत विमानतळ प्रशासनदेखील इंडिगोच्या व्यवस्थापनाला सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनादेखील प्रतिसाद मिळाला नाही.
४० वर्षे मागे, बोर्डिंग पास मॅन्युअली करण्याची वेळ
सर्व्हरच बंद पडल्याने विमानसेवेत महत्त्वाची बोर्डिंग पास प्रक्रियाच बंद पडली. परिणामी, विमानतळावर बहुतांश प्रक्रिया मॅन्युअली म्हणजेच संगणकाशिवाय करण्याची वेळ व्यवस्थापनावर आली. सुरू विमानाच्या प्रवाशांच्या बोर्डिंग पासची प्रक्रिया हाताने करावी लागत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.
पर्यटकांनी रद्द केले येणे
या बिघाडाचा पर्यटनासाठी शहरात आलेल्या विदेशी पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. विमानसेवा सुरळीत होणे अनिश्चित असल्याने ४ पर्यटकांना कारने मुुंबईला जावे लागले. शनिवारी येणे नियोजित असताना अमेरिकेच्या काही पर्यटकांनी येणेच रद्द केल्याने पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेनशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी सांगितले.