जमीनमालकांमुळे MIDC उभी, त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवीन; उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:21 PM2022-10-22T12:21:22+5:302022-10-22T12:22:43+5:30
दिल्ली,मुंबई इंंडस्ट्रीयल कॉरिडोअरसाठी शेंद्रा, लाडगाव, करमाड आणि बिडकीन येथील शेतकऱ्यांनी सुमारे दहा हजार एकर जमिन शासनाला दिली.
औरंगाबाद: शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्यामुळे आज येथे एमआयडीसी उभी आहेत, त्यांनी भूखंडासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पसंत पडेल असाच भूखंड त्यांना द्यावा, त्यांना त्रास द्याल तर तुम्हाला घरी पाठवू, असा सज्जड दम, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑरिक सिटीच्या अधिकाऱ्यांना दिला.
दिल्ली,मुंबई इंंडस्ट्रीयल कॉरिडोअरसाठी शेंद्रा, लाडगाव, करमाड आणि बिडकीन येथील शेतकऱ्यांनी सुमारे दहा हजार एकर जमिन शासनाला दिली. या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेल्या जमिनीच्या १५ टक्के जमिन, उद्योग करण्यासाठी ज्या दराने जमिन घेतली त्याच दराने देण्याचा कायदा आहे. यानुसार अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑरिक सिटीने मुख्य रस्त्यावरील एकही भूखंड न देता कोपऱ्यातील अंतर्गत रस्त्यामधील भूखंड दिले गेले. एका शेतकऱ्यास देण्यात आलेल्या भूखंडातील जमिनीतील मुरूम खोदून नेण्यात आलेला आहे. यामुळे त्यांना तात्काळ भूखंड बदलून द्यावा, असे आदेश पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. मात्र अद्यापही हे काम झाले नसल्याचे शेतकऱ्याच्यावतीने आमदार हरिभाऊ बागडे यांनी उद्याेगमंत्र्यांच्या निदर्शनास आणले, तेव्हा उद्योगमंत्र्यांनी ऑरिकच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आदेश दिल्यानंतरही तुम्ही शेतकऱ्यास भूखंड का बदलून दिला नाही, असा सवाल करीत शेतकऱ्यास त्रास द्याल तर थेट घरी पाठविन, एम.डी.नाही त्यांची जागा दाखवून देईल असा सज्जड दम देत आजच्या आज त्या शेतकऱ्यास भूखंड बदलून देण्याचे आदेश दिले.
यावेळी पालकमंत्री तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण आणि बिडकीन एमआयडीसीतील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. आमदार रमेश बाेरनारे यांनी वैजापूर एमआयडीसीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. आ. प्रदीप जैस्वाल, ऑरिकचे जितेंद्र काकुस्ते, व्यवस्थापक महेश पाटील ,एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतनसिंह गिरासे, मुख्य अभियंता श्रीहरी दराडे यांची उपस्थिती होती.