एमआयडीसीची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 08:49 PM2019-04-04T20:49:48+5:302019-04-04T20:50:40+5:30
पहिल्याच दिवशी अनेक अतिक्रमण काढून मुख्य चौक व रस्ते मोकळे केले होते. मात्र, ही मोहीम थंडावल्याचे चित्र आहे.
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक व निवासी क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची एमआयडीसीने जोरदार मोहीम सुरु केली होती. पहिल्याच दिवशी अनेक अतिक्रमण काढून मुख्य चौक व रस्ते मोकळे केले होते. मात्र, ही मोहीम थंडावल्याचे चित्र आहे.
वाळूज उद्योगनगरीसह निवासी क्षेत्रातील मुख्य चौक व रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे कायम वाहतुकीची कोंडी व अपघाताच्या घटना घडत आहेत. एमआयडीसीने अनेकदा अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविली. पण प्रत्येकवेळी राजकीय दबाव आल्याने एमआयडीसीला आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अतिक्रमण हटविण्यासंबंधी चर्चा केली होती.
दरम्यान, एमआयडीसीने २५ मार्च रोजी अतिक्रमण मोहीम राबविली. यात पंढरपुरातील महावीर चौक, तिरंगा चौक, कामगार चौक रस्ता, बजाजनगरातील मोरे चौक, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणीचे शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी एमआयडीसीने पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण पुढे करत मोहिम थांबविली.
या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निवडणूकीमुळे पोलीस बंदोबस्त मिळत नाही. आचारसंहितेमुळे अतिक्रमण हटावसाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा नव्याने विविदा काढून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.