‘एमआयडीसी’ ने वाढविले भूखंडांचे दर
By Admin | Published: May 26, 2016 12:02 AM2016-05-26T00:02:46+5:302016-05-26T00:07:13+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक, व्यापारी व निवासी वापराच्या भूखंडांच्या दरात वाढ केली आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक, व्यापारी व निवासी वापराच्या भूखंडांच्या दरात वाढ केली आहे. नव्या दराची अंमलबजावणीदेखील तातडीने सुरू करण्यात आली आहे. खुलताबाद ही जिल्ह्यातील सर्वात स्वस्त औद्योगिक वसाहत ठरली आहे.
‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भूखंडांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईजवळील मरोळ ही औद्योगिक वसाहत राज्यात सर्वात महागडी ठरली आहे. या वसाहतीत औद्योगिक भूखंडाचे दर ४५,४०० रुपये प्रतिचौ.मी., तर व्यापारी भूखंडाचे दर १,३६,२०० रुपये प्रतिचौ.मी. ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आठ वसाहती
औरंगाबाद जिल्ह्यात आठ औद्योगिक वसाहती आहेत. रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, शेंद्रा (सेझ), पैठण, वैजापूर आणि खुलताबाद यांचा यात समावेश आहे.
कन्नड येथे औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वेस्टेशन, चिकलठाणा व वाळूज वसाहतीत भूखंडांचे दर समान असतील. या वसाहतींमध्ये औद्योगिक भूखंडांचे दर २,०५० रुपये (प्रतिचौ.मी.), व्यापारी भूखंडाचे दर ४,१०० रुपये (प्रतिचौ.मी.), तर निवासी भूखंडाचे दर ३,०७५ रुपये असतील. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत हेच दर अनुक्रमे १,८७० रुपये, ३,७४० रुपये आणि २,८०५ रुपये (प्रतिचौ.मी.) असतील. शेंद्रा (सेझ) वसाहतीत निवासी व व्यापारी भूखंड उपलब्ध नाहीत. तेथील औद्योगिक भूखंडाचा दर १,८७० रुपये असणार आहे.
पैठण वसाहतीत औद्योगिक, निवासी व व्यापारी भूखंडांचे दर अनुक्रमे १७०, ३४० व २५५ रुपये (प्रतिचौ.मी.) असतील. खुलताबाद वसाहतीत हेच दर अनुक्रमे ३५,७० आणि ५५ रुपये, असे राहतील. ही वसाहत जिल्ह्यात सर्वात स्वस्त ठरली आहे. वैजापूर वसाहतीत औद्योगिक भूखंडाचा दर १,१८० रुपये आणि व्यापारी भूखंडाचा दर २,३६० रुपये असेल.