एमआयडीसीचे मृगजळ शेतकऱ्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:04 AM2021-05-22T04:04:12+5:302021-05-22T04:04:12+5:30
कन्नड : तालुक्यासाठी एमआयडीसीचे स्वप्न हे शेतकऱ्यांसाठी केवळ ‘मृगजळ’ ठरले आहे. मात्र, हे भूत गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ...
कन्नड : तालुक्यासाठी एमआयडीसीचे स्वप्न हे शेतकऱ्यांसाठी केवळ ‘मृगजळ’ ठरले आहे. मात्र, हे भूत गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्याने प्रस्तावित एमआयडीसीसाठी संपादनाच्या चक्रात अडकलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही आणि दुसरीकडे जमिनींची खरेदी-विक्रीची प्रक्रियाही थांबल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकतर जमिनी संपादित करून मोबदला द्या, अन्यथा खरेदी-विक्रीसाठी परवानगी द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात एमआयडीसी झाल्यास बेकार तरुणांच्या हाताला काम मिळेल. त्याचप्रमाणे उद्योग-व्यवसाय भरभराटीस येऊन तालुक्याच्या विकासाला हातभार लागेल. या प्रामाणिक हेतूने एमआयडीसीसाठी दिवंगत माजी आ. रायभान जाधव यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यानंतर माजी आ. नितीन पाटील यांनी प्रयत्न केले. त्यानंतर माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी डिसेंबर २०१५ मध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळविली. त्यासाठी रेल-विठ्ठलपूर शिवारातील खाजगी २४ गटांमधील १६४ हेक्टर व सरकारी ४ हेक्टर जमीन संपादनासाठी आरक्षित करण्यात आली. त्यामुळे सदर जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहारावर बंदी घालण्यात आली. मात्र, त्यानंतर हालचाली बंद झाल्या. यामुळे प्रस्तावित जमिनींचा मोबदला मिळेना, तर दुसरीकडे जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारास बंदी घालण्यात आल्याने जमीनमालक शेतकरी हैराण झाले आहेत.
संपादनासाठी प्रस्तावित जमिनीवर कर्जही मिळेना, खरेदी-विक्रीही करता येईना त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पाच वर्षे उलटून गेले. मात्र, भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. तसेच या शेतकऱ्यांना भूसंपादनाबाबत कोणतीही नोटीस मिळाली नाही.