छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

By संतोष हिरेमठ | Published: September 13, 2024 02:01 PM2024-09-13T14:01:06+5:302024-09-13T14:01:51+5:30

‘ऑन द स्पाॅट’ @ रेल्वे स्टेशन : अव्वाच्या सव्वा भाडेवसुली, रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी येतात स्वत: नातेवाईक, रिक्षावर भरवसा नाहीच

Midnight rickshaw journey 'danger' in Chhatrapati Sambhajinagar; High rent collection, feeling of insecurity | छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्रीनंतर रेल्वे स्टेशनवरून रिक्षाचा प्रवास करणे प्रवाशांसाठी काहीसे ‘डेंजर’च ठरत आहे. कारण रात्री १२ वाजेनंतरचे भाडे ऐकून काही क्षणांसाठी प्रवाशांचे डोळे पांढरे होण्याचीच वेळ येते. मनाला वाटेल ते भाडे रिक्षाचालकांकडून सांगितले जाते. शिवाय रात्री उशिरा रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी नातेवाईक दुचाकी, चार चाकी घेऊन स्वत: येत असून, रिक्षावर भरवसा उरला नसल्याची परिस्थिती आहे.

रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असते आणि याच ठिकाणी अनेक रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसतो. रात्रीच्या वेळी ही मनमानी अधिक वाढते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने बुधवारी मध्यरात्री रेल्वे स्टेशन गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. मध्यरात्रीनंतर रिक्षाचालकांची चालणारी मनमानी, अरेरावी कारभार पाहायला मिळाला. त्याच वेळी काही रिक्षाचालक प्रामाणिकपणे प्रवासी नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांचे वाहन गस्तीसाठी काही वेळासाठी येत असल्याचेही दिसून आले.

रात्री १२:३० वाजेपर्यंत सिटर; नंतर बंद
रेल्वे स्टेशनवरून रात्री १२:३० वाजेपर्यंत सिटर रिक्षा धावतात. त्यासाठी प्रतिसिटप्रमाणे आकारण्यात येणारे भाडे दिवसा एक आणि रात्री अधिक पाहायला मिळाले. सिडको बस स्थानकासाठी दिवसा ३० रुपये, तर रात्री १२:३० वाजेपर्यंत ५० रुपये आकारण्यात येत होते.

बसून राहा.. अन्य प्रवासी मिळेपर्यंत
एक प्रवासी मिळाल्यानंतर त्याला रिक्षात बसवून ठेवण्यात येते. त्यानंतर रिक्षाचालक दुसऱ्या प्रवाशाच्या शोधात जातो. थेट रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाऊन प्रवासी आणले जातात. किमान ४ ते ५ प्रवासी मिळाल्याशिवाय रिक्षा जागेवरून हलत नाही.

सिडको बस स्थानकाचे भाडे २०० रुपये
रात्री १ वाजेनंतर रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे मागतात. सिडको बस स्थानकाला जाण्यासाठी रात्री १ वाजेनंतर एका रिक्षाचालकाला भाडे विचारण्यात आले. तेव्हा त्याने त्यासाठी २०० रुपये सांगितले. इतर रिक्षाचालकांना भाडे विचारले असता, २०० रुपयेच सांगण्यात आले. छावणीसाठी १५० रुपये, क्रांती चौकासाठी १५० रुपये, सातारा खंडोबा मंदिरासाठी ३०० रुपये भाडे सांगण्यात आले.

नातेवाईक येईपर्यंत महिलांची धडधड
रेल्वे स्टेशनवरून रात्री रिक्षाने घरी जाणे महिला टाळत असल्याचे दिसून आले. महिला प्रवाशांना रिक्षाचालक ‘कुठे जायचे?’ अशी विचारणा करीत होते. ‘नातेवाईक येत आहेत,’ असे सांगून महिला रिक्षाचालकांना नकार देत होत्या. दुचाकी, चार चाकी घेऊन नातेवाईक येत होते. तसेच दुचाकी घेऊन नातेवाईक आल्यानंतर अधिक सामान असल्याने काही महिला रिक्षात बसून जात होत्या. दुचाकीधारक नातेवाईक रिक्षाच्या पाठीमागे जात होते.

रात्रीच्या वेळी तपासणी मोहीम घेऊ
रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांची तपासणी मोहीम हाती घेतली जाईल. अधिक भाडे आकारणी, मीटरने येण्यास नकार दिल्याप्रकरणी प्रवाशांनी संबंधित रिक्षाच्या नंबरसह तक्रार करावी. अशांवर कारवाई केली जाईल.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे
मीटरचे दर मागणीप्रमाणे मिळाले नाही त्यामुळे अनेक रिक्षाचालक मीटरने जाण्यास नकार देतात. रात्रीच्या वेळी दीडपट भाडे घेता येते. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे. रेल्वे स्टेशनवर प्रिपेड रिक्षा सुरू करावी. त्याचा फायदा प्रवाशांना होईल.
- निसार अहमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

Web Title: Midnight rickshaw journey 'danger' in Chhatrapati Sambhajinagar; High rent collection, feeling of insecurity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.