दीड वर्षात मोंढ्याचे स्थलांतर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:39 AM2017-09-29T00:39:32+5:302017-09-29T00:39:32+5:30
येत्या दीड वर्षात नियोजनबद्ध पद्धतीने मोंढ्याचे स्थलांतर करण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याच्या होलसेल व्यापा-यांना प्लॉट देण्यात येतील. येत्या दीड वर्षात नियोजनबद्ध पद्धतीने मोंढ्याचे स्थलांतर करण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बागडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक राजू शिंदे, उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक दामोदर नवपुते, सजन मते, विजय औताडे, पंचायत समिती सभापती ताराबाई उकिर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, मी जेव्हा जालन्याचा पालकमंत्री होतो त्या काळात तेथील मोंढ्याचे स्थलांतर केले होते. सध्या उत्पन्नामध्ये मराठवाड्यात जालन्याची बाजार समिती नंबर वन बनली आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादेतील बाजार समितीचा विकास करायचा आहे. येत्या दीड वर्षात मोंढ्याचे स्थलांतर करण्यात येईल. यासाठी व्यापारीही अनुकूल आहेत.
सभापती राधाकिसन पठाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संचालक राम शेळके, गणेश दहीहंडे, अलका दहीहंडे, संगीता मदगे, शिवाजी वाघ, हरिशंकर दायमा, प्रशांत सोकिया, बाबासाहेब मुगदल, देवीदास कीर्तिशाही, नारायण मते, विकास दांडगे यांच्यासह शेतकरी, व्यापारी, हमाल यांची उपस्थिती होती.
यावेळी बाजार समितीच्या २० वर्षांच्या काळात पहिल्यांदाच येथील आदर्श शेतकरी, अडत्या, हमालांचा सत्कार करण्यात आला.