निवडणुकीच्या तोंडावर गावागावातील मतदारांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:04 AM2021-01-04T04:04:56+5:302021-01-04T04:04:56+5:30
सोयगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर सोयगाव तालुक्यातून शेकडो मजुरांचे स्थलांतर होऊ लागल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. ...
सोयगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर सोयगाव तालुक्यातून शेकडो मजुरांचे स्थलांतर होऊ लागल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. मतदारांना गावातच कसे थांबवून ठेवता येईल, यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागला आहे.
सोयगाव तालुका म्हटले की, बहुतांश भाग हा शेतमजुरांचा ओळखला जातो. ऊसतोडणीसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर राज्याबाहेर तसेच अन्य जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. या कामगारांना आपल्या मूळगावी मतदानासाठी आणण्यासाठी गावागावातील पुढारी कामाला लागला आहे. त्यात आता आणखी एक संकट उभे राहिले आहे. गावात उरलेल्या मजुरांनी देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थलांतर सुरू केले आहे. गावात हाताला काम मिळत नसल्याने पोटापाण्याच्या चिंतेने ते कामाच्या भटकंतीसाठी बाहेर पडले आहेत.
------------
उमेदवारांना चिंता
सोयगाव तालुक्यात एकूण चाळीस गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुुळे गावात एका एका मताचे महत्त्व प्राप्त होते. अशा परिस्थितीत मात्र, कामाच्या शोधासाठी काही लोक शहराकडे स्थलांतरित होऊ लागल्याने उमेदवारांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दिवाळीपूर्वी गाव सोडलेल्या मजुरांना गावात आणण्याचे आव्हान असताना गावातील नव्याने स्थलांतरित मतदार रोखून ठेवण्यासाठी देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
छायाचित्र ओळ - सोयगाव तालुक्यातून मजुरांनी कामाच्या शोधासाठी शहराकडचा धरलेला रस्ता.