स्थलांतराने वाडी-तांडे ओस

By Admin | Published: December 11, 2014 12:21 AM2014-12-11T00:21:38+5:302014-12-11T00:41:01+5:30

संतोष धारासूरकर ,जालना शेतात काम नाही...गावात रोजगार नाही...मग ४-६ महिने काढावीत तरी कशी ? या विवंचनेने ग्रासलेले शेकडो शेतमजूर, अल्पभूधारक लेकराबाळांसह

Migratory wadi-tanks dew | स्थलांतराने वाडी-तांडे ओस

स्थलांतराने वाडी-तांडे ओस

googlenewsNext


संतोष धारासूरकर ,जालना
शेतात काम नाही...गावात रोजगार नाही...मग ४-६ महिने काढावीत तरी कशी ? या विवंचनेने ग्रासलेले शेकडो शेतमजूर, अल्पभूधारक लेकराबाळांसह गोराढोरांनिशी गाव-तांडे सोडून रोजगाराच्या शोधार्थ महानगरांकडे धावू लागले आहेत.
या जिल्ह्यातून दरवर्षी शेतमजुरांचे शेकडो कुटुंबिय रोजगारानिमित्त महानगरांकडे स्थलांतरीत होतात. विशेषत: दिवाळीचा सण आटोपला की, या कुटुंबियांना स्थलांतराचे वेध लागतात. त्याप्रमाणे याही वर्षी नित्यनेमाप्रमाणे शेतमजुरांसह त्यांचे कुटुंबिय आॅक्टोबर अखेरपासून पुणे, नाशिक, मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यात यावर्षी विशेष हे की, शेतमजुरांबरोबर अल्प भूधारक सुद्धा कुटुंबियांसह स्थलांतरीत होत आहेत. गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाच्या झळा हेच त्यामागचे प्रमुख कारण आहे.
या जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी या दोन तालुक्यातून दरवर्षी जवळपास ४ ते ५ हजार कुटुंबिय उसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरीत होत असतात. याही वर्षी नित्यनेमाप्रमाणे हे कुटुंबिय लेकराबाळांसह ढोरांनिशी बैलगाड्या घेऊन बारामती, इंदापूर पासून थेट कर्नाटकातील भालकी, बिदर वगैरे भागात रवाना झाले आहेत. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आता या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक वाड्यातांड्यांमधून किमान सरासरी ४० ते ५० कुटुंबे स्थलांतरीत झाले आहेत. म्हणजेच उसतोडीसाठी स्थलांतराचेही प्रमाण सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहे. शेतमजुरांबरोबर अल्पभूधारक सुद्धा उसतोडणीस गेले आहेत.
यावर्षी जिल्ह्यात अल्पसा पाऊस झाला. घनसावंगी व अंबड या दोन तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्मा सुद्धा पाऊस झाला नाही. परिणामी खरिपातील सोयाबीन पुरेशा प्रमाणात शेतकऱ्याच्या पदरात पडले नाही. दोन वेचणीतच कापूस आटोपला. पावसाअभावी रब्बीच्या पेरण्या झाल्याच नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, त्या-त्या भागात पिकेच जमिनीच्या वर आलेली नाहीत. परिणामी रब्बीतील गव्हासह ज्वारी, हरभरा वगैरे पिकांना पाणी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मुळात जमिनीतील पाणी पातळी मोठी घट आहे. शंभर फुटापर्यंत विहिरींनी तळ गाठला आहे. असे हे दुष्काळी चित्र दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करीत आहे. शेतांमधून काम नाही. गावात रोजगार नाही. कारण छोटछोटी का असेना, कामे, व्यवहार ठप्प आहेत. शेतात गेले तर पाच मिनिटे सुद्धा उभे रहावे वाटत नाही. घरी करमत नाही. या स्थितीत ४-६ महिने काढावीत तरी कसे ? लेकराबाळांसह गुरे-ढोरे जगवावीत तरी कशी? असा यक्षप्रश्न शेतमजुरांबरोबर अल्पभूधारकांसमोर पडला आहे. ४
अंबड तालुक्यातील गोविंदपूर हे छोटेसे गाव. ४०० ते ५०० गावची लोकसंख्या. या गावातून गेल्या महिन्याअखेरपर्यंत ५० बैलगाड्यानिशी कुटुंब उसतोडीनिमित्त जिल्ह्याबाहेर रवाना झाले. मुलाबाळांसह गुरेढोरे व संसारोपयोगी साहित्यानिशी हे कुटुंबिय ४-६ महिन्यांसाठी बाहेरगावी गेले असून मे अखेर किंवा जूनमध्ये मान्सून बरसल्यानंतरच हे कुटुंबिय माघारी परततील, असे चित्र आहे.
४अंबड व घनसावंगी या दोन तालुक्यात बहुतांशी वाडी, तांड्यांमधून प्रत्येकी ४० ते ५० कुटुंबे उसतोडीसह रोजगाराच्या शोधात महानगरांकडे रवाना झाले असून गोविंदपूर, दहेगाव खुर्द, कुक्कडगाव, सुखापूरी, ताडहदगाव, भालसखेडा, लालवाडी, पारनेर, शेवगा तसेच जामखेड, चिंचखेड, मसई, बोरी वगैरे गावांमधून आता या कुटुंबियातील केवळ वयोवृद्ध नागरिक घरदार सांभाळत आहेत.

Web Title: Migratory wadi-tanks dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.