माईल्ड स्टील बॉडीच्या ६२ बस धावत आहेत रस्त्यावर; लाल बसची बांधणी झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 07:33 PM2018-10-22T19:33:33+5:302018-10-22T19:35:53+5:30
एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या लाल बसची निर्मिती आणि पुनर्बांधणी दोन्ही बंद झाली आहे.
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या लाल बसची निर्मिती आणि पुनर्बांधणी दोन्ही बंद झाली आहे. लाल बसऐवजी कार्यशाळेत चार महिन्यांपासून केवळ माईल्ड स्टीलच्या बसची बांधणी केली जात आहे. कार्यशाळेतून आतापर्यंत स्टील बॉडीच्या ६२ बस रस्त्यावर दाखल झाल्या आहेत.
एस. टी. महामंडळाच्या साध्या बसने (लाल) खेड्यापाड्यांपर्यंत प्रवाशांसाठी सेवा देत ‘लालपरी’ म्हणून ओळख निर्माण केली. या साध्या बसच्या बांधणीत अॅल्युमिनियमचा वापर केला जात होता. ‘एस. टी.’ चा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी महामंडळाने माईल्ड स्टीलचा वापर करून बसची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर या बसची बांधणी करण्यात आली. वर्षभरानंतर जुलै महिन्यापासून चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत या बसची नियमित बांधणी सुरू झाली. याठिकाणी आता अॅल्युमिनियमऐवजी माईल्ड स्टील बॉडीच्या बसची निर्मिती होत आहे.
नव्या चेसीसच्या पुरवठ्याअभावी लाल बसची निर्मिती आधीच ठप्प होती. आता पुनर्बांधणीतही लाल बसचे रूपांतर स्टील बॉडीच्या बसमध्ये होत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत ‘लालपरी’ हद्दपार होणार आहे. स्टील बॉडीच्या बसची बांधणी खाजगी बसला नजरेसमोर ठेवून होत आहे. आरामदायक आसन व्यवस्थेसह विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. माईल्ड स्टीलमध्ये पुढच्या टप्प्यात स्लीपर बसची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळ खाजगी बससेवेला चांगलीच टक्कर देत आहे.
दोन दिवसांत तीन बस
चिकलठाणा कार्यशाळेत दोन दिवसांत तीन बसची बांधणी होत आहे. जुलै महिन्यांत ५, आॅगस्टमध्ये ११, सप्टेंबरमध्ये २३ आणि आॅक्टोबरमध्ये आतापर्यंत २३ बसची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यशाळेत बांधण्यात आलेल्या माईल्ट स्टीलच्या बसेस आतापर्यंत नांदेड, लातूर, औरंगाबादसह मराठवाड्यातील विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. चिकलठाणा कार्यशाळेत माईल्ड स्टीलमध्ये स्लीपर बस बांधणीसंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही.
- यू. ए. काटे, व्यवस्थापक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा, एस. टी. महामंडळ