माडज येथील युवक चोरी प्रकरणात जेरबंद
By Admin | Published: July 8, 2016 12:20 AM2016-07-08T00:20:16+5:302016-07-08T00:36:31+5:30
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील माडज येथे ४ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या किराणा दुकानातील चोरी प्रकरणात गावातीलच एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे़
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील माडज येथे ४ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या किराणा दुकानातील चोरी प्रकरणात गावातीलच एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चोरीतील दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत़ तर चोरीची दुचाकी वापरणाऱ्या अंबेजवळगा (ता़उस्मानाबाद) येथील एकास दुचाकीसह पोलिसांनी गजाआड केले़ ही कारवाई बुधवारी करण्यात आली़
उमरगा तालुक्यातील माडज येथील सुरेश यशवंतराव पाटील यांचे गावातील शिवाजी चौकात किराणा दुकान आहे़ भरवस्तीतील किराणा दुकान ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ चोरट्यांनी दुकानातील १ लाख ५० हजाराचे किराणा साहित्य आणि दोन मोबाईल असा जवळपास १ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता़ याबाबत सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ दिपाली घाडगे-घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोउपनि आवटे, पोना मुल्ला, कळसाईन, सुरवसे यांनी माडज येथीलच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली देवून चोरीतील दोन मोबाईल पोलिसांना दिले़ त्याला ताब्यात घेवून उमरगा पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
अंबेजवळगा येथील एकाकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती स्थागुशाला मिळाली होती़ या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोउपनि आवटे, हवालदार जगताप, घुगे, पोना समाधान वाघमारे, कोळी, पोकॉ दसवंत यांनी दत्ता दिगंबर पवार (रा़ अंबेजवळगा तांडा) याला ताब्यात घेतले़ चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येवू लागल्याने पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह दत्ता पवार याला गजाआड केले. पुढील कारवाईसाठी पवार यास ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.