दूधना प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पोहोचलेच नाही
By Admin | Published: February 17, 2016 11:11 PM2016-02-17T23:11:31+5:302016-02-17T23:16:03+5:30
परभणी : निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेच नाही़
परभणी : निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेच नाही़ नोंदविलेल्या मागणीपेक्षा २ दलघमी पाणी कमी सोडल्याने परभणी तालुक्यातील १२ गावे तहानलेलीच आहेत़ यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे़
सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीत पाणी सोडण्याची मागणी आ़ विजय भांबळे यांनी केली होती़ तसेच आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी ३ नोव्हेंबर २०१५, ३१ जानेवारी २०१६ रोजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन दूधनाचे १० दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती़ यासंदर्भात मंत्रालय व विभागीय आयुक्तस्तरावर बैठकही झाली़ त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दूधना नदीपात्रातून ७ दलघमी पाणी ९०० क्युसेसने चार दरवाज्यातून सोडण्यात आले़ हे पाणी नदीपात्र परिसरातील बहुतांश गावांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून पुन्हा आ़ डॉ़ पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली़ त्यानुसार आणखी १ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले़ हे पाणी मोरेगाव, इरळद, झरीनंतर परभणी तालुक्यातमील सनपुरीपर्यंत पोहोचले़ त्यानंतर पुढे पाणी गेलेच नाही़ त्यामुळे परभणी तालुक्यातील करडगाव, हिंगला, धारणगाव, साटला, समसापूर, धार, मांगणगाव, मटकऱ्हाळा, दुर्डी, देवठाणा, पिंपळगाव टोंग, साबा या गावांपर्यंत पोहचलेच नाही़ त्यामुळे ही गावे अद्यापही तहानलेलीच आहेत़ नदीपात्रात १० दलघमी पाणी सोडले असते तर ते पाणी टेलपर्यंत पोहचले असते़ परंतु, पाणी सोडण्यातूनही राजकारण झाले आणि १० दलघमी पाणी सोडण्याऐवजी केवळ ८ दलघमी पाण्यावरच बोळवण करण्यात आली़ (जिल्हा प्रतिनिधी)