निधी नसताना वाटली कोट्यवधीच्या कामाची पत्रे

By Admin | Published: September 11, 2014 12:37 AM2014-09-11T00:37:25+5:302014-09-11T01:06:56+5:30

उस्मानाबाद : गैरव्यवहारामुळे तेरणा सहकारी साखर कारखाना बंद पाडला. याप्रकरणी दाद मागणाऱ्या सभासद, शेतकऱ्यांची सातत्याने चुकीची माहिती देऊन

Millions of billions of worksheets felt without funds | निधी नसताना वाटली कोट्यवधीच्या कामाची पत्रे

निधी नसताना वाटली कोट्यवधीच्या कामाची पत्रे

googlenewsNext


उस्मानाबाद : गैरव्यवहारामुळे तेरणा सहकारी साखर कारखाना बंद पाडला. याप्रकरणी दाद मागणाऱ्या सभासद, शेतकऱ्यांची सातत्याने चुकीची माहिती देऊन आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिशाभूल केल्याचा आरोप करीत, आता आमदार फंडाच्या माध्यमातूनही राजेनिंबाळकरांनी सर्वसामान्य जनतेचीही दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख यांनी केला आहे. अनेक कामे होणार नाहीत हे माहित असतानाही १ कोटी ४० लाख इतक्या रकमेच्या कामाची जाणिवपूर्वक अतिरिक्त पत्रे देऊन निंबाळकरांनी या मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली असे देशमुख यांचे म्हणणे आहे.
देशमुख यांनी या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या तेरणा कारखान्याची निंबाळकर यांच्याच मार्गदर्शनाखाली दूरवस्था झाली. कारखान्यातील कोट्यावधीचे साहित्य भंगाराच्या नावाखाली विकण्यात आले आहे.
याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकरी सभासदांची फसवणूक करण्याचे काम झाले आहे. असाच प्रकार मार्केटींग फेडरेशनकडे थकित असलेल्या शेतकऱ्यांच्या हरभरा आणि तुरीच्या थकीत रक्कमाबाबतही झाला होता. त्यावेळी पैसे संबंधित कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर आंदोलनाचा स्टंट करून आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याऐवजी प्राधान्यक्रम डावलून स्वत:सह मागे-पुढे फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यांचे पैसे काढून घेतले. आता आमदार फंडात निधी शिल्लक नसताना १ कोटी ४० लाख इतक्या रक्कमेच्या अतिरिक्त कामाची पत्रे देऊन आ. निंबाळकर यांनी सर्वसामान्यांची दिशाभूल केली आहे.
देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, निंबाळकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी दोनशे लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र २०१३-१४ या वर्षातील अपूर्ण कामासाठी त्यांना ७२.१९ लाखाचा निधी आवश्यक होता. त्यामुळे २०१४-१५ यासाठी त्यांच्याकडे केवळ १२७.८०४ लाख रुपयांचीच नवीन कामे प्रस्तावित करण्यासाठी निधी उपलब्ध होता. असे असताना १८ मे २०१४ ते २३ आॅगस्ट २०१४ या कालावधीत आ. ओम राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद, कळंब तालुक्यात ८१ कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांची अंदाजे किंमत २६८.०५ लाख इतकी होते.
म्हणजेच आ. ओम राजेनिंबाळकर यांच्याकडे मतदारसंघातील कामासाठी १४०.०५ लाखाचा निधी उपलब्ध असताना, त्यांनी दुपटीपेक्षा जास्त म्हणजे २६८.०५ लाखाची कामे प्रस्तावित करून अनेक गावातील ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. ही एकप्रकारे जनतेची तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांची दिशाभूल तसेच फसवणूक असल्याचे सांगत याप्रकरणी निधी नसताना लाखो रुपयांच्या कामाची अतिरिक्त पत्रे दिलेल्या ग्रामस्थांची निंबाळकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सुरेश देशमुख यांनी या प्रसिध्दीपत्रकात केली आहे. (प्रतिनिधी)
आमदाराने त्याचा निधी त्याच वर्षामध्ये खर्च करणे अपेक्षित आहे. जनता आमच्याकडे कामे घेवून आल्यानंतर आम्ही त्यांना पत्र देतो. परंतु, अनेकवेळा संबंधितांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळत नाही. अशावेळी निधी पडून रहाण्यापेक्षा लागलीच दुसरे पत्र दिले जाते. जनतेला जी आश्वासने दिली, ती मी पूर्ण केली आहेत. एखाद्याला पत्र दिले आणि काम झाले नाही, असा एकतरी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसने उभा करून दाखवावा, असे आव्हान आ. ओम राजे यांनी दिले. प्रस्तावामध्ये त्रुटी असतील आणि त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली नसेल तर त्यात माझी चूक काय? असा सवाल करीत आलेला निधी ज्या-त्या वर्षातच खर्च व्हावा, असा माझा कटाक्ष राहिला आहे. त्यामुळेच माझ्या फंडातील एक रूपयाही अखर्चित रहात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी खरे कोणाचे आणि खोटे कोणाचे? हे जनतेला चांगले ठावूक आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Millions of billions of worksheets felt without funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.