कोट्यवधींचे फटाके ग्राहकांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:07 AM2018-11-07T00:07:01+5:302018-11-07T00:07:08+5:30
औरंगाबाद : दिवाळीनिमित्त शिवाकाशीहून १० ट्रक फटाके शहरात दाखल झाले आहेत. सुमारे ७ कोटींचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत; मात्र ...
औरंगाबाद : दिवाळीनिमित्त शिवाकाशीहून १० ट्रक फटाके शहरात दाखल झाले आहेत. सुमारे ७ कोटींचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत; मात्र ग्राहकांनी पाठ फिरविल्याने लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी फटाका बाजारात शुकशुकाट जाणवत होता.
रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी येथील फटाका बाजारात दिवसभर तुरळक ग्राहकी दिसून आली. अनेक दुकाने अशी होती की तिथे सायंकाळपर्यंत बोहणीही झाली नव्हती. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने शुकशुकाट जाणवत होता. जे ग्राहक खरेदीसाठी आले होते त्यांचा कल कमी आवाजाचे फटाके खरेदी करण्याकडे होता. त्यातील अनेक जण लहान मुलांपुरतेच फटाके खरेदी करताना दिसून आले. अनार, भुईचक्र, रंगीत सुरसुऱ्या, फटाक्यांची लड, रॉकेट खरेदी केले जात होते. खरेदीला गर्दी होत नसल्याने विक्रेत्यांच्या चेहºयावर चिंता स्पष्टपणे दिसून येत होती. फटाके विक्रेते संघटनेचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी सांगितले की, न्यायालयाने फटाके फोडण्यास वेळेची मर्यादा घातली आहे, तसेच समाजसेवी संस्थेने व शाळांमधून वायू व ध्वनी प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यात आली. याचा मोठा परिणाम फटाके विक्रीवर झाला आहे, तसेच पूर्वी ५ टक्के एलबीटी लागत असे, आता १८ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. यामुळेही फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे जे ग्राहक येत आहेत तेही हात आखडता घेत आहेत. आता सर्व मदार लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या विक्रीवर टिकून आहे.
चौकट
शहरात विनापरवाना फटाके विक्री
फटाके विक्रीसाठी पोलीस आयुक्तांनी शहराच्या बाहेर जागा ठरवून दिल्या आहेत. तिथेच परवानगी घेऊन फटाके विक्री करणे अपेक्षित आहे; मात्र जुना मोंढा, शहागंज व शहराच्या काही भागांत हातगाड्यांवर विनापरवाना फटाके विकले जात आहेत. विशेष म्हणजे यात सुतळी अॅटमबॉम्ब, रॉकेट, फटाक्यांच्या लडींचाही समावेश आहे. स्वस्तात मिळत असल्याने फटाके खरेदीसाठी हातगाड्यांभोवती गर्दी होती. विनापरवाना फटाके विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. येथे निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीतीही व्यापाºयांनी व्यक्त केली.