लाखो भाविकांनी घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन
By Admin | Published: December 26, 2016 12:05 AM2016-12-26T00:05:18+5:302016-12-26T00:06:37+5:30
तुळजापूर : रविवार व नाताळची सुट्टी यामुळे २५ डिसेंबर रोजी लाखो भाविकांनी तुळजाभवानी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली.
तुळजापूर : रविवार व नाताळची सुट्टी यामुळे २५ डिसेंबर रोजी लाखो भाविकांनी तुळजाभवानी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. मंदिरातील दर्शन मंडपातील सर्व मजले सायंकाळी सहापर्यंत भाविकांच्या गर्दीने गच्च भरले होते. गेल्या आठ दिवसांपासून शहरात देवी भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर रात्री दोनपासून दर्शनासाठी खुले जात आहे.
ख्रिसमसचा दिवस, रविवारी सुट्टी यामुळे शनिवारपासून शहरात देवी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील कार पार्किंग, खाजगी वाहनांनी हाऊसफुल्ल झाली होती, तर कमानवेस, उस्मानाबाद रोड, शिवाजी चौक या परिसरात ही खाजगी वाहने दिवसभर मोठ्या प्रमाणात दिसून आली. भवानी रोड, महाद्वार रोड, भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. वाढत्या गर्दीमुळे शहरातील सर्व लॉज, धर्मशाळा, भक्ती निवास भाविकांनी हाऊसफुल्ल झाले होते. प्रसाद दुकाने, खेळणी दुकाने, हॉटेल गजबजले होते.
मंदिरातील भाविकांची वाढलेली गर्दी पाहून व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना देवी दर्शनासाठी मंदिर २१ तास खुले ठेवण्यात आले होते. भाविक देवीसाठी साडी-चोळी, बांगडी, पुष्पहार खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत होते. (वार्ताहर)