पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराने वाचवले लाखो टन लाकूड; स्मशानभूमीत होतोय गट्टूचा वापर सुरू
By मुजीब देवणीकर | Published: March 18, 2023 04:12 PM2023-03-18T16:12:53+5:302023-03-18T16:13:11+5:30
शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी करून त्यापासून गट्टू तयार केले जातात.
छत्रपती संभाजीनगर : अंत्यसंस्कारासाठी शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकूड लागत होते. आता महापालिकेने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने पर्यावरणपूरक लाकडी गट्टूचा वापर सुरू केला आहे. २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत आता अंत्यसंस्कार होत आहेत. शहरातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडी गट्टू वापरले जात आहेत. आणखी चार ठिकाणी लवकरच सुरुवात होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर छत्रपती संभाजीनगर शहराने हा प्रयोग सुरू केला आहे.
अंत्यसंस्कार विधीवतच झाले पाहिजे, यावर आजही नागरिक भर देतात. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपाने विद्युतदाहिनी सुरू केली. मात्र, त्यात अंत्यसंस्कार करायला नातेवाईक तयारच होत नाहीत. त्यामुळे कैलासनगर येथील विद्युतदाहिनी बंद पडली आहे. लाकूड, शेण्यांचा वापर करूनच अंत्यसंस्कार व्हावेत, याकडे अधिक कल असल्याने या प्रकारामुळे शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकडाचा वापर होत होता. लाखो झाडांची कत्तल करावी लागत होती. यावर केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लाकडी गट्टूचा पर्याय सुचविला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने २८ जून २०२२ पासून लाकडी गट्टूचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. कोणत्या स्मशानभूमीत वापर? पुष्पनगरी, भीमनगर भावसिंगपुरा, कैलासनगर, मिटमिटा, पडेगाव, एन-६, बेगमपुरा, गादीया विहार, कांचनवाडी, मसनतपूर, मुकुंदवाडी, मुकुंदवाडी गाव आदी ठिकाणी लाकडी गट्टू वापरले जातात.
गट्टूचे दर काय? पंजाब रिनिवल कंपनीकडून लाकडी गट्टूचा पुरवठा प्रत्येक स्मशानभूमीवर स्मशानजोगींना केला जातोय. ७ रुपये ७५ पैसे एका किलोसाठी दर आकारला जातोय. ९० मिमीचा एक गट्टू असतो. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लोखंडी केजसुद्धा या कंपनीने मोफत तयार करून दिले. आतापर्यंत १६० टन गट्टूचा पुरवठा करण्यात आला. २०२४ नंतर किलोमागे दरवर्षी १ रुपयांची वाढ होणार आहे. मनपाने कंपनीसोबत पाच वर्षांचा करार केला.
लाकूड गट्टूत फरक काय?
अंत्यसंस्कार करण्यासाठी पूर्वी ३५० ते ४०० किलो लाकूड लागत होते. आता २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत अंत्यसंस्कार होत आहेत. विशेष बाब म्हणजे आता धूर अजिबात होत नाही. प्रदूषण रोखण्यात मनपाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
कसे तयार होतात गट्टू
खासगी कंपनीची जिल्ह्यात गट्टू तयार करणारी पाच केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्राच्या जवळील शेतकऱ्यांच्या शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी केला जातो. या कचऱ्यापासून गट्टू तयार होतात.
गट्टूचे फायदे
लाकडी गट्टूमुळे प्रदूषण रोखण्यात बरीच मदत होईल. शेतकरी त्यांच्या शेतात कचरा जाळून टाकत होते, ते आता थांबेल. यामुळे त्यांच्याकडून होणारे प्रदूषण थांबेल, त्यांना आता कंपनीद्वारे चार पैसेही मिळत आहेत. यामुळे अनेकांना राेजगार मिळाला आहे. डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.