व्यवहार लाखोंचे, खरेदीखत मात्र केवळ काही हजारांचे...!
By Admin | Published: September 8, 2015 12:20 AM2015-09-08T00:20:29+5:302015-09-08T00:37:37+5:30
औरंगाबाद : मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील जमिनीवरील अवैध ले-आऊटमधील भूखंड विक्री करून सामान्य नागरिकांना कोट्यवधींना गंडा घालणाऱ्या
औरंगाबाद : मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील जमिनीवरील अवैध ले-आऊटमधील भूखंड विक्री करून सामान्य नागरिकांना कोट्यवधींना गंडा घालणाऱ्या भूखंड माफियांनी हे व्यवहार काही हजारांचे असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी चुकविली आहे. केवळ ५० ते १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर हा व्यवहार करून नोटरीसमक्ष हे व्यवहार केले.
फसवणूक झालेले रामदास ढोले यांनी राजू तनवाणी, राज आहुजा यांच्याकडून रेणुकामातानगर या ले-आऊटमधील २००५ मध्ये एक भूखंड १ लाख ४५ हजार रुपयांना खरेदी केला होता. या भूखंड खरेदी विक्रीची बॉण्ड पेपरवर नोटरी करून देताना आरोपींनी तो केवळ ३५ हजार रुपयांत विक्री केल्याचे नमूद केले. एवढेच नव्हे तर ढोले यांनी २००८ मध्ये आणखी एक भूखंड ३ लाख ४५ हजार रुपयांत खरेदी केला. या व्यवहाराचा बॉण्ड पेपर बनविताना तो केवळ ७० हजार रुपयांत ढोले यांना कायमस्वरूपी विकल्याचे नमूद केले. अशा प्रकारे या वसाहतीमधील २१० भूखंड विक्री केलेले आहेत आणि हे सर्व व्यवहार अशाच प्रकारे दाखविल्याचे नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केलेल्या कागदपत्रात नमूद आहे.
५० ते १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर त्यांनी हे व्यवहार केलेले आहेत. जमिनीचा कोणताही व्यवहार करताना शासनास स्टॅम्प ड्यूटी भरणे बंधनकारक आहे, असे असताना तनवाणी- आहुजांनी कोट्यवधी रुपये कमावून शासनाची मोठी फसवणूक केली. कोणत्याही मोठ्या उलाढालीवर आयकर विभागाची नजर असते. मात्र हे व्यवहार आयकर विभागाच्या नजरेस येऊ नयेत, यासाठी त्यांनी रजिस्ट्री (खरेदीखत) न करता नोटरीद्वारे प्लॉटची विक्री करून कोट्यवधी रुपये कमावले.