वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनप्रसंगी राडा, एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने
By संतोष हिरेमठ | Published: December 30, 2023 12:15 PM2023-12-30T12:15:17+5:302023-12-30T12:27:10+5:30
मराठवाड्यातील पहिली हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू हाेण्यापूर्वीच शहरातील नेत्यांमध्ये उदघाटन पत्रिकेतून नाव वगळल्याने ‘मानापमान नाट्य’ रंगलेले पाहायला मिळाले.
छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्यासाठी खासदार इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते होते. खासदार जलील स्टेशनमध्ये येत असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. त्याच वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'मोदी, मोदी' अशी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर पोलिसांनी खासदार जलील यांना स्टेशनमधील आरक्षित नेले. तर पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना स्टेशन बाहेर काढले.
जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारी मनमाड ते जालना मार्गावर ट्रायल रन घेण्यात आली. आठ बोगींची भव्य रेल्वे शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उदघाटन पार पडेल. मात्र, मराठवाड्यातील पहिली हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू हाेण्यापूर्वीच शहरातील नेत्यांमध्ये उदघाटन पत्रिकेतून नाव वगळल्याने ‘मानापमान नाट्य’ रंगलेले पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रिकेत नाव वगळून आमंत्रण न दिल्याने टीका केली, तर मी केंद्रीय मंत्री असून, त्यावर माझे नाव नाही. पत्रिकेवर केवळ पंतप्रधानांचे नाव आहे. ‘टॉस’वर जिंकून आलेल्या खासदारांनी विकासकामांत अडथळा आणू नये, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी दिले होते.
आज सकाळी उद्घाटनप्रसंगी खासदार इम्तियाज जलील रेल्वे स्टेशनवर आले असता भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. दरम्यान, एक्सप्रेस जालन्याहून छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर येण्यापूर्वी खासदार इम्तियाज जलील निघून गेले. तसेच जर कार्यकर्त्यांनी एक्सप्रेस रोखली तर त्यास पोलिस जबाबदार असतील असा इशारा देखील खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
दोन पत्रिका, शहरात केवळ पंतप्रधानांचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून या एक्स्प्रेसचे उदघाटन करतील. जालना येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करतील. याची स्वतंत्र निमंत्रण पत्रिका तयार करून वाटण्यात आली. त्यावर १५ लोकप्रतिनिधींची नावे छापण्यात आली आहेत. मात्र, कराडांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर केवळ पंतप्रधानांचा उल्लेख करून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी आमंत्रित केले.