एमआयएमचा पुन्हा सेना-भाजपला पाठिंबा!
By Admin | Published: June 1, 2016 12:09 AM2016-06-01T00:09:28+5:302016-06-01T00:20:56+5:30
औरंगाबाद : सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याऐवजी महापालिकेत एमआयएम या विरोधी पक्षाने स्थायी समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला.
औरंगाबाद : सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याऐवजी महापालिकेत एमआयएम या विरोधी पक्षाने स्थायी समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला. गुरुवार दि. २ जून रोजी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करण्याची ही एमआयएम पक्षाची दुसरी वेळ आहे. माजी आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला एमआयएमने मतदानात पाठिंबा दिला होता.
महापालिकेत अतिशय महत्त्वाचे पद समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी आता एमआयएमचा उमेदवार नसेल. सेनेचे उमेदवार मोहन मेघावाले यांच्या निवडीची घोषणाच आता बाकी आहे. महाराष्ट्रात सेना -भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्या एमआयएमने दुसऱ्यांदा घेतलेली ही भूमिका बुचकळ्यात टाकणारी आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाला अल्पावधीत कलाटणी देण्याचे काम हैदराबाद येथील एमआयएम पक्षाने दोन वर्षांपूर्वी केले. मुस्लिम मतांच्या बळावर राज्यात दोन आमदार निवडून आणले. औरंगाबाद महापालिकेत २५ नगरसेवक निवडून आले.
२ जून रोजी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होत आहे. त्याचप्रमाणे पाच विविध विषय समित्यांची निवडणूकही याच दिवशी घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत मंगळवार, दि.३१ मे रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती. शिवसेना- भाजपने उमेदवारी अर्ज घेतले. एमआयएमने स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्जच घेतले नाहीत.
उद्या १ जून रोजी स्थायी समिती सभापतिपदासाठी युतीचे उमेदवार मोहन मेघावाले अर्ज दाखल करणार आहेत.
विषय समिती सभापतीचे उमेदवारही दुपारी ३.३० वाजेपर्यंत या विहित मुदतीत अर्ज दाखल करतील.
महापालिकेत २५ आणि एका अपक्ष नगरसेवकासह विरोधी पक्ष म्हणून एमआयएमने निवडणुकांमध्ये आपले उमेदवार देणे क्रमप्राप्त होते. एमआयएमने एकाही निवडणुकीत उमेदवार दिला नाही. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध होत आहे, हे विशेष.
महापालिकेत वर्षभरापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमने गंगाधर ढगे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीतही एमआयएमकडे बहुमत नव्हते.
४ढगे यांचा पराभव अटळ आहे, याची जाणीवही पक्षाला होती. तेव्हाच एमआयएमने महापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होऊ द्यायला हवी होती.
४अचानक एमआयएमने स्थायी समिती सभापती निवडणुकीत यू टर्न का घेतला यावर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
मागील एक वर्षापासून एमआयएम पक्षातील नगरसेवकांमध्ये ज्वालामुखी खदखदत आहे. पक्षात लोकशाही मूल्य अजिबात नाहीत. हुकूमशाही कारभाराला सर्वच नगरसेवक कंटाळले आहेत. एमआयएमकडून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अनेकजण काँग्रेस-राष्ट्रवादी कल्चरमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांना हैदराबादी ‘शेरवाणी’कल्चर पचायला तयार नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून जावेद कुरैशी यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत खदखद अधिक वाढू लागली आहे.
स्थायी समितीमध्ये एमआयएम पक्षाचे चार सदस्य आहेत. युतीकडे ११ सदस्य आहेत. बहुमत युतीकडे असल्यामुळे आम्ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. पराभूत होण्यासाठी निवडणूक लढविण्यात काय अर्थ आहे.
-इम्तियाज जलील, आमदार,
मित्रपक्षांचा नकार
स्थायी समिती व इतर विषय समित्यांमध्ये एमआयएमसोबत काँग्रेस व इतर पक्ष येण्यास तयार नाहीत. आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही निवडणुकीतून माघार घेतली.
-नासेर सिद्दीकी, गटनेता, महापालिका1
एमआयएमच्या नगरसेवकांना विविध आमिषे दाखविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच आ. इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाचे उत्तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक खाजा शफोद्दीन यांनी दिले.
2एमआयएमने हैदराबादहून नगरसेवक आणले नाहीत. जे नगरसेवक एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले आहेत, ते कालपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. एमआयएम पक्षात त्यांची घुसमट होत असेल तर ते स्वगृही परतणार आहेत.