एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी औरंगाबादेत, आगामी निवडणूकांची रणनीती आखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 02:00 PM2021-10-30T14:00:55+5:302021-10-30T14:05:51+5:30
MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad: महापालिका निवडणुकीच्या अनुषगांने त्यांचा दोन दिवसीय दौरा आहे.
औरंगाबाद : एमआयएम पक्षाचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी ( MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad) शुक्रवारी सकाळी शहरात दाखल झाले.दिवसभर त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या अनुषगांने त्यांचा दोन दिवसीय दौरा आहे. मागील काही दिवसांपासून पक्षात दोन गट पडले आहेत. त्यामुळे ओवेसी यांना शहरात धाव घ्यावी लागली असल्याची चर्चा आहे. आज सकाळी खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृहात खा. असदुद्दीन ओवेसी, इम्तीयाज जलील यांच्या उपस्थितीत आगामी निवडणूक संदर्भात बैठक सुरु झाली आहे. यावेळी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय अडी अडचणी जाणून घेतल्या जात असून विश्रामगृह परिसरात मोठी गर्दी.
औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार
औरंगाबाद महापालिका सध्या ११५ नगरसेवक डोळ्यासमोर ठेवून प्रभाग रचनेवर काम करीत आहे. त्यासाठी १२ लाख २८ हजार ०३२ लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती. २०२१ मध्ये जनगणना झाली नाही. लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेतला तर भविष्यात औरंगाबादची लोकसंख्या १४ ते १६ लाखांच्या आसपास येईल. एवढ्या लोकसंख्येसाठी १२६ किमान आणि जास्तीत जास्त १५६ नगरसेवक करता येईल. सदस्य वाढ १७ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असेही शासनाने म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत भविष्यात १२५ ते १३० सदस्य राहतील.
नवीन वॉर्ड झाल्यास गुंठेवारीतच जास्तीचे वॉर्ड
वाढीव लोकसंख्येच्या आधारे महापालिका हद्दीत १२६ ते १३० वॉर्ड होणे शक्य आहे. यामध्ये सर्वाधिक वॉर्ड दाट लोकसंख्या असलेल्या गुंठेवारी वसाहतींमध्ये होण्याची शक्यता आहे. ४५ वॉर्ड म्हणजेच १५ प्रभाग गुंठेवारी वसाहतींमधील असू शकतात, अशी चर्चा आहे. १९९० च्या दशकात शहरात गुंठेवारी वसाहतींचा उदय झाला. सध्या १७४ च्या आसपास गुंठेवारी वसाहतींमध्ये दोन लाखांच्या आसपास मालमत्ता असून, ८ ते १० लाखांच्या आसपास नागरिक या वसाहतींमधून वास्तव्यास असण्याचा अंदाज आहे. कामगार, मजूर, हातगाडीचालक, हातावर पोट असणारे नागरिक वसाहतींमध्ये राहतात.