500 ट्रक चोरी प्रकरण: एमआयएम नगरसेवक जफर शेख अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 03:08 PM2018-05-06T15:08:34+5:302018-05-06T15:10:10+5:30
'लोकमत'च्या बातमीचा मोठा इफेक्ट
औरंगाबाद : चोरीचे ५०० ट्रक आणि हायवा गाड्या विकणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी एमआयएम नगरसेवक जफर शेख याला पोलिसांनी आज दुपारी बेड्या ठोकल्या. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. याआधी या प्रकरणात पोलिसांनी जफरचा भाऊ बाबर शेखला अटक केली होती. त्याच्याविरोधात शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
बाबर शेखला काल अटक करण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी जफर शेखला बेड्या ठोकल्या. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. चोरीचे पाचशे ट्रक विकणाऱ्या रॅकेटसंदर्भातील वृत्त 'लोकमत' शनिवारी प्रसिद्ध केलं होतं. यानंतर शनिवारीच बाबर शेखला, तर त्यानंतर आज जफर शेखला पोलिसांनी अटक केली. 500 वाहनांच्या चोरीच्या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकरणात महापालिकेतील कोणत्या नगरसेवकाचा सहभाग आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला होता.
राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून चोरीचे ट्रक, हायवा आदी महागड्या गाड्या औरंगाबादेत आणून त्यांची संपूर्ण रंगरंगोटी करायची. या वाहनांवर बनावट चेसीस क्रमांक टाकून बीड आरटीओ कार्यालयातून पासिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर ते वाहन विकायचं, असं या टोळीच्या कामाचे स्वरुप होतं. ही टोळी राज्यभरात सक्रीय होती. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. मात्र त्यांना औरंगाबाद पोलिसांकडून फारसं सहकार्य मिळत नव्हतं. मात्र आज मुख्य आरोपी एमआयएम नगरसेवक जफर शेखला अटक झाली. भिवंडी पोलिसांचं हे मोठं यश मानलं जातंय.