एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी
By मुजीब देवणीकर | Published: November 14, 2024 02:36 PM2024-11-14T14:36:33+5:302024-11-14T14:37:32+5:30
विकासकामांचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जातोय; ‘एमआयएम’चे नासेर सिद्दीकी
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्ष कधीही मत विभाजनावर विसंबून राहात नाही. २०१४ सारखी परिस्थिती निर्माण व्हावी, असेही वाटत नाही. आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्यावर जनतेसमोर जात आहोत. मतदारांकडून चांगले समर्थनही मिळत आहे. आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत. सर्व समाजाचे आम्हाला समर्थन मिळत आहे. कोणीही उमेदवार स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही. मी विकासकामांचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जातोय, असे मत औरंगाबाद मध्यचे ‘एमआयएम’चे उमेदवार नासेर सिद्दीकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न - २०१४ सारखी लॉटरी लागेल, असे वाटते का?
उत्तर - एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही. दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही.
प्रश्न - मतविभाजनापेक्षा तुम्ही स्वबळावर निवडून याल का?
उत्तर - हिंदू मतांच्या विभाजनाशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही. अनेक समाजाचे नागरिक आम्हाला दररोज भेटत आहेत.
प्रश्न - वंचित फॅक्टर तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल का?
उत्तर - वंचितने मागील काही निवडणुकांत आपली शक्ती दाखवून दिली. मात्र, आता त्यांचा जनाधार कमी होत आहे.
प्रश्न - आपण केलेले काणेतेही एक विकासकाम सांगावे.
उत्तर - नगरसेवक म्हणून काम करताना मनपातील सत्ताधारी मुस्लिमबहुल भागात विकासकामांसाठी निधी देत नसत. हा निधी खेचून आणला.