एमआयएमचा मार्ग स्वतंत्र!
By Admin | Published: November 16, 2014 12:09 AM2014-11-16T00:09:31+5:302014-11-16T00:09:31+5:30
औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत.
औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. महाराष्ट्र विधानसभेत आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, देणारही नाही. आमचा मार्ग वेगळा असल्याचे प्रतिपादन खा. असदोद्दीन ओवेसी यांनी केले.
आमखास मैदानावर भर पावसात आयोजित सभेस आ. इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, माजी मंत्री गंगाधर गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र विधानसभेत ज्या पद्धतीने विश्वासमत पारित केले ते खूपच हास्यास्पद होते. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही. काँग्रेसने तेलंगणच्या मुद्यावर काय केले. मोक्का कायदा त्यांनीच पारित केला. राष्ट्रवादीचे नेते आता मोदींच्या सुरात सूर मिळवीत आहेत. हे सर्व राजकारण अत्यंत खालच्या पातळीवरचे असल्याचे त्यांनी आपल्या शैलीत नमूद केले.
वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या धनाढ्य मंडळींनी बळकावल्या आहेत, त्या परत घेण्यात येतील. त्यासाठी पक्षाचे आमदार विधानसभेत आवाज बुलंद करतील. वेरूळ येथे शस्त्रसाठा पकडल्यानंतर ज्या निष्पाप तरुणांना नऊ वर्षांपासून तुरुंगात ठेवण्यात आले, त्यांचा निकाल लवकरात लवकर लावावा. एटीएसने औरंगाबादच्या नईमला कोठे ठेवले, या सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभेत सरकारला विचारण्यात येतील. औरंगाबाद शहराला पुन्हा ऐतिहासिक दर्जा मिळवून देण्यात येईल, असेही ओवेसी यांनी सांगितले. तत्पूर्वी, आ. इम्तियाज जलील यांचे भाषण झाले. या जाहीर सभेत काही अपक्ष, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रवेश केला.
आज सकाळी खा. ओवेसी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.