एमआयएमचा औरंगाबादच्या सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:25 AM2018-06-27T00:25:26+5:302018-06-27T00:30:36+5:30
गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील युवकांना पुन्हा दुस-या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनच्या (एमआयएम) कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत साडेतीन तास ठिय्या दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील युवकांना पुन्हा दुस-या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनच्या (एमआयएम) कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत साडेतीन तास ठिय्या दिला.
या घटनेमुळे सिटीचौक, शहागंज, जुनाबाजार परिसरातील काही दुकाने व्यापाºयांनी बंद केली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जमावाला शांततेचे आवाहन केल्यावर तणाव निवळला.
दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या युवकांना अलीकडेच जामीन मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी त्यांना दंगलीच्या अन्य दुसºया गुन्ह्यात (पोलीस निरीक्षकावर हल्ला) ताब्यात घेतले.
सायंकाळी उशिरा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अंजूम शेख यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते संतप्त झाले व मोठ्या संख्येने सिटीचौक ठाण्यासमोर जमा झाले.
ताब्यात घेतलेल्या युवकांना सोडून द्यावे, अशी मागणी करीत दुपारी २ वाजेपासून एमआयएम कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर एमआयएमचे आ. इम्तियाज जलिल यांच्यासह पदाधिकाºयांनी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली.
दंगलप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून एका समाजावर अन्याय करण्याचा प्रश्नच नाही, तसेच कुणीही गदारोळ करू नये. शांतता राखावी. त्यासाठी शिष्टमंडळानेच नागरिकांना शांततेचे आवाहन करावे, असेही आयुक्तांनी आवाहन केले. त्यानंतर ठाण्यासमोरील जमाव हळूहळू पांगला.
दरम्यान संतप्त जमाव ठाण्यावर आल्यामुळे हत्यारबंद पोलीस कुमक, वज्रवाहन, बुलेट प्रूफ जाकिटसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.