मृदंगाच्या निनादात चिमुकल्यांची दिंडी
By Admin | Published: July 11, 2014 11:38 PM2014-07-11T23:38:43+5:302014-07-12T01:13:17+5:30
बीड: आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील बाल गोपाळांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून दिंडी काढली. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
बीड: आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील बाल गोपाळांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून दिंडी काढली. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात जिल्ह्यातील सर्वच शाळांचा सहभाग होता. मृदंगाचा निनाद व ज्ञानोबा-तुकाराम चा जयघोष सगळीकडे घुमत असल्याने बुधवारी सकाळी जिल्हयात सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
माध्यमिक विद्यालय, धोंडराई
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अभंग, गौळण, भारूड आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक भक्तराज पौळ, बहीर, सागडे, देशपांडे, पाठक यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय
बीड येथील राष्टी्रय माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवारी शहरातून दिंडी काढण्यात आली. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आगवान यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद शाळा, मस्साजोग
केज तालुक्यातील मस्साजोग येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून वारकरी दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी खांद्यावर पताका घेऊन टाळ- मृदंगासह विठू नामाचा जयघोष केला. यावेळी मुख्याध्यापक कोतींब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद मुर्शदपूर
बीड तालुक्यातील मुर्शदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने स्काऊट विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीक्षेत्र नारायणगड येथे स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी उपस्थित भाविकांची आरोग्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. यामध्ये निर्माल्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची काळजी आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी गाईडस् अनिता जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
माऊली प्राथमिक विद्यालय
बीड शहरातील माऊली प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त शहरातून विद्यार्थ्यांनी दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)