एमआयएमची पंकजा मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच ऑफर; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 04:55 PM2023-06-24T16:55:10+5:302023-06-24T16:57:11+5:30
बीआरएस, एमआयएम दोन्ही पक्षांनी केलेल्या दाव्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
छत्रपती संभाजीनगर: बीआरएसने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्ष प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करू, अशी ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच, आम्ही दोन वर्षांपूर्वीच पंकजा मुंडे यांना ऑफर दिली होती, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री, तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची पक्षात कोंडी झाली आहे. त्यांनी वेळोवेळी यावर नाराजी व्यक्त करूनही पक्षाने त्यांचे अद्याप पुर्नवसन केले नाही. यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेश करून मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. यावरची चर्चा सुरु असतानाच आज एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, बीआरएस आता म्हणत असले तरी आम्ही दोन वर्षे आधीच पंकजा मुंडे यांच्याशी बातचित केली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना संपर्क केला होता, मात्र यात पुढे काही होऊ शकले नाही. ओवसींच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बीआरएस आणि आता एमआयएम दोन्ही अपक्षांनी केलेल्या दाव्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...: अंबादास दानवे
पंकजा मुंडे बीआरएसमध्ये जातील का? असा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. यावर दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आज नाही तर उद्या नेतृत्व करतील. त्या भाजपत आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आतापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून नेतृत्व नाही असे कोणी सांगितले, असेही दानवे म्हणाले.