मन सुन्न करणारी घटना ! कोरोनाने घेतला बाप-लेकाचा बळी, दोन दिवसांचा चिमुकलाही देतोय मृत्यूशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 07:39 PM2021-04-19T19:39:00+5:302021-04-19T19:39:25+5:30
मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण सोयगाव तालुका हादरला आहे.
सोयगाव : कोरोनाने दोन दिवसांत बाप-लेकाचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील तितुर गावात घडली. तर मृत्यू झालेल्या तरुणाला दोन दिवसांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्त झाले असून चिमुकल्याचीही प्रकृती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती आहे. भगवान खैरनार (५६), राहुल भगवान खैरनार (३०) असे कोरोनाने मृत्यू झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण सोयगाव तालुका हादरला आहे.
तितुर येथील भगवान पंडित खैरनार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मुलगा राहुल खैरनार याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने राहुल यांना चाळीसगाव येथे हलविण्यात आले. तरी देखील प्रकृती गंभीर होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. सोमवारी पहाटे औरंगाबादकडे घेऊन जात असताना वाटेतच राहुल यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राहुलच्या पत्नीस शनिवारी प्रसुती कळा सुरू झाल्याने पाचोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. परंतु चिमुकल्याची प्रकृतीदेखील गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्यात राहुलच्या पत्नीची प्रकृती देखील गंभीर झालेली आहे. अवघ्या दोन दिवसांच्या आत बाप-लेकाचा कोरोनाने बळी घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.