मिनी क्रीडा संकुलाचे हस्तांतरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 08:14 PM2018-10-27T20:14:12+5:302018-10-27T20:14:52+5:30
वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने पाठविलेल्या मिनी क्रीडा संकुल हस्तांतरण प्रस्तावाकडे भारतीय खेल प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने हस्तांतरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. क्रीडा संकुलाचा काहीच उपयोग होत नसल्याने खेळाडू, प्रशिक्षकांसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने पाठविलेल्या मिनी क्रीडा संकुल हस्तांतरण प्रस्तावाकडे भारतीय खेल प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने हस्तांतरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. क्रीडा संकुलाचा काहीच उपयोग होत नसल्याने खेळाडू, प्रशिक्षकांसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सिडको वाळूज महानगरातील उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने या भागात दोन मिनी क्रीडा संकुल उभारले. प्रत्येकी दीड हेक्टरवर उभारलेल्या संकुलाचा देखभाल दुरुस्ती व पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा खर्च परवडणारा नसल्याने सिडकोने दोन्ही संकुलांचे भारतीय खेल प्राधिकरणकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला. तसा त्यांना प्रस्तावही दिला.
मात्र, प्रस्तावानुसार खेल प्राधिकरणच्या काही अधिकाºयांनी संकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. हस्तांतरण झाल्यास येथील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रस्ताव पाठवून दोन महिने उलटून गेली आहेत; पण अजून हस्तांतरणाच्या काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.
संकुलाचे अजून उद्घाटनही झाले नाही, तरीही संकुलाची दुरवस्था झाली आहे. या भागातील काही स्पोर्ट अकॅडमीने भाडे तत्त्वावर संकुल देण्याची मागणी केली आहे; पण प्रशासनाकडून याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. खेळाडूंसाठी काहीच उपयोग होत नसल्याने संकुल नुसते शोभेची वास्तू बनली आहे. प्रशासन काहीच निर्णय घेत नसल्याने या भागातील खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. याविषयी सिडकोचे अभियंता नितीन कडरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
सिडकोने निर्णय घ्यावा
खेळाडूंच्या भल्यासाठी प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन संकुलाचे एक तर हस्तांतरण करावे किंवा एखाद्या संस्थेला द्यावे, असे क्रीडा प्रशिक्षक प्रा. भरतसिंग सलापुरे यांनी सांगितले.