‘मिनी घाटी’ डिसेंबरपर्यंत सज्ज

By Admin | Published: July 15, 2015 12:29 AM2015-07-15T00:29:28+5:302015-07-15T00:41:52+5:30

औरंगाबाद : शहराजवळील सर्वसामान्य रुग्णांसाठी आणि घाटी रुग्णालयावरील भार कमी होण्याच्या दृष्टीने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘मिनी घाटी’ म्हणजे चिकलठाणा येथील

'Mini Valley' ready till December | ‘मिनी घाटी’ डिसेंबरपर्यंत सज्ज

‘मिनी घाटी’ डिसेंबरपर्यंत सज्ज

googlenewsNext



औरंगाबाद : शहराजवळील सर्वसामान्य रुग्णांसाठी आणि घाटी रुग्णालयावरील भार कमी होण्याच्या दृष्टीने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘मिनी घाटी’ म्हणजे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम सुरू झाले. जानेवारी २०१५ मध्ये हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी खुले होणार होते; परंतु निधीअभावी वेळोवेळी काम थांबल्याने रुग्णालयाची उभारणी लांबणीवर पडली. आजघडीला रुग्णालयाचे ९५ टक्के काम झाले असून, उर्वरित काम तीन-चार महिन्यांत पूर्ण होईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत ‘मिनी घाटी’ रुग्णसेवेसाठी सज्ज होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह विविध भागांतून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. गेल्या काही वर्षांत घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढला आहे. त्यामुळे हा ताण कमी होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम सुरूझाले. विविध सुविधा असलेले दोनशे खाटांचे हे रुग्णालय उभारण्यात येत असून, प्रसूती, मेडिसीन, सर्जरी असे विविध विभाग या ठिकाणी असणार आहेत. ३८ कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने मिळालेले जवळपास २३ कोटी रुपये रुग्णालयाच्या बांधकामावर खर्च झाले आहे; परंतु निधीअभावी कामाची गती काहीशी मंदावली गेली.
सिडको-हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निधीअभावी बांधकाम थांबलेले नाही. आतापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, आगामी तीन-चार महिन्यांत काम पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
घाटी रुग्णालयातील रुग्णसंख्या
घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात दररोज जवळपास ७० प्रसूती, तर १० सिझेरियन शस्त्रक्रिया होतात, तर बाह्यरुग्ण विभागात दिवसभरात जवळपास ४ हजार रुग्ण तपासण्यात येतात. शिवाय १०० हून अधिक रुग्ण दाखल होतात. अनेकदा ही संख्या यापेक्षा अधिक असते. त्यामुळे घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा काहीसा ताण दिसून येतो. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Web Title: 'Mini Valley' ready till December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.