अब्दुल सत्तारांचे पुष्पवृष्टीने स्वागत, पण भोवती गराडा कार्यकर्त्यांचा की बाऊन्सरचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 01:36 PM2022-11-11T13:36:49+5:302022-11-11T13:37:28+5:30
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना वाय प्लस सुरक्षा आहेच, परंतु आज जरा जास्तच बंदोबस्त त्यांच्या ताफ्यात दिसल्याची चर्चा होती.
औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांना अपशब्द वापरल्याने टीकेचे धनी झालेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवारी कडक बंदोबस्तात विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीला आले. विशेष म्हणजे या बंदोबस्तात खासगी बाऊन्सरचा देखील समावेश असल्याची चर्चा होती.
या बैठकीला येण्यापूर्वी सुभेदारी विश्रामगृहात सत्तार समर्थकांची मोठी गर्दी होती. समर्थकांनी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले. कृषिमंत्री सत्तार यांना वाय प्लस सुरक्षा आहेच, परंतु आज जरा जास्तच बंदोबस्त त्यांच्या ताफ्यात दिसल्याची चर्चा होती. विभागीय आयुक्तालयातील बैठकीनंतर सत्तार यांना पत्रकारांनी खा. संजय राऊत हे कारागृहातून बाहेर आल्याप्रकरणी विचारले असता, त्यांनी अतिशय सावध अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोण कुठून आले, कसे आले हे बोलण्याची आज वेळ नाही. कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे. निकाल अजून मी वाचलेला नाही. खा. राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते वाघ आहेत की आणखी कोण आहेत? यावर मला काही टिप्पणी करायची नाही, नसता पुन्हा नवीन भूत माझ्या मागे लावाल. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. खा. सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मी सुरक्षित आहे, असे सांगून त्यांनी आयुक्तालयातून काढता पाय घेतला.
सत्तारांची सावधगिरी...
सत्तार यांनी ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले. सत्तार यांच्या मुंबई व औरंगाबादेतील घरावर राष्ट्रवादी काँग्रेसने दगडफेक करत आंदोलने केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना जाहीर कार्यक्रमांना न जाण्याचा सल्ला दिल्याची चर्चा होती. त्यानंतर गुरुवारी आयुक्तालयात त्यांनी पीक विम्याबाबत बैठक घेतली. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता. इतरवेळी माध्यमांना विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर चर्चेत येतील, अशी विधाने करणारे कृषिमंत्री सत्तार आज मात्र सावध उत्तरे देत होते. मी सुरक्षित असल्याचे सांगून त्यांनी प्रस्थान केले.