रेल्वे मंत्री, पालकमंत्री अन् खासदारांचे मुखवटे घालून स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 12:26 AM2017-05-08T00:26:54+5:302017-05-08T00:27:28+5:30
लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर शहरात आंदोलन सुरू असून, लातूर बंद, स्वाक्षरी मोहीम अशा वेगवेगळ्या टप्प्यांत आंदोलन करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर शहरात आंदोलन सुरू असून, लातूर बंद, स्वाक्षरी मोहीम अशा वेगवेगळ्या टप्प्यांत आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी गंजगोलाई परिसरात स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि खा. सुनील गायकवाड यांचे मुखवटे परिधान करून स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अनोख्या आंदोलना दरम्यान विस्तारीकरणाला स्वाक्षरी करून अनेकांनी विरोध दर्शविला.
कृती समितीच्या वतीने ९ मे रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शहरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. लातूर-मुंबई एक्स्प्रेसचे २६ एप्रिलपासून बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लातूरकरांच्या भावना तीव्र झाल्या असून, शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि खा.डॉ. सुनील गायकवाड यांचे मुखवटे परिधान करून गंजगोलाईत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
या अभियानाला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान, शादुल शेख, वसिम खान, शेख बबलू, सलमान तांबोळी, मुजम्मील शेख आदींनी हे अभियान राबविले.