भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 04:07 PM2020-03-08T16:07:37+5:302020-03-08T16:17:59+5:30
स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या.
औरंगाबाद : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना जवळपास पूर्ण झाली आहे. तर कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित सोमवारी पाण्याची चाचणी होणार असून, अधिवेशन संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या योजनेच्या पाण्याच उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
सततच्या वेगवेगळ्या कारणांनी ही योजना गेल्या 10 वर्षांपासून रखडली होती. स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या. त्यातच मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र पोलीस बंदोबस्तात हे काम सुरु ठेवण्यात आले आणि अखेर या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर पुढील आठवड्यात उद्घाटन सुद्धा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाली असून, अंतिम चाचणीनंतर गावकऱ्यांना थेट पाणी मिळणार आहे. जायकवाडी धरण परिसरात पंपहाऊस उभारण्यात आले असून तेथून हे पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे खेर्डा प्रकल्पात थेट पाणी जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर होणार आहे. तर ही योजना पूर्ण झाल्यावर 55 गावंचा प्रश्न मिटणार असून, 14 हजार 582 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.
भूमरेंनी शब्द पाळला
निवडणुका येताच सर्वच पक्षाकडून ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनावरून राजकरण केले जात असल्याचे पाहायला मिळायचे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तर 2020 पूर्वीच ही योजना पूर्ण करणार असल्याचं आश्वासन भुमरे यांनी गावकऱ्यांना दिले होते. त्यामुळे योजनेचे काम पाहता भूमरेंनी आपला शब्द पाळला असल्याचं शेतकरी बोलत आहे.
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाला असून, पाण्याच्या चाचण्या घेण्यात येत आहे. योजनेच्या उद्घाटन झाल्यावर गावकऱ्यांना या पाण्याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. मात्र असे असताना सुद्धा काही लोकं अफवा पसरवण्याचे काम करत आहे. अनिल निंभोरे (कार्यकारी अभियंता )