पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:49 IST2023-11-06T15:48:16+5:302023-11-06T15:49:00+5:30
चुरशीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी स्वाती काळे विजयी

पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव
पैठण: पैठण तालुक्यातील एकमेव वडवाळी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थक गटाचे वर्चस्व राहिले. राज्य जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांच्या शिवबालाजी ग्राम विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी (उबाठा गटाच्या) पॅनलला फक्त तीन जागेवर समाधान मानावे लागले.
वडवाळी गावात शिंदे गट व ठाकरे गट असे दोन पॅनल समोरासमोर उभे होते. गावकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नंदलाल काळे यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला भरघोस मताने निवडून दिले. वडवाळी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या सौ स्वाती किशोर काळे या सरपंच पदी निवडून आल्या.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ स्वाती काळे (७१०) यांनी विरोधी उमेदवार प्रतिभा खोपडे (६४२) यांचा ६८ मतांनी पराभव केला. अन्य विजयी उमेदवारात मंगलाबाई पाचे, संगीता मैंदड, गणेश शिंदे, छाया गायकवाड, प्रियंका जाधव, अमोल बर्डे, प्रभाकर पाचे व रितू गायकवाड यांचा समावेश आहे. इतर चार ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत शंकर थोरे ( पारूंडी), परवेज बागवान ( पाचोड बु), कोमल गिरगे ( नायगाव) व राहूल बनकर ( आडूळ बु ) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करीत विजय संपादीत केला.
विजयी पॅनलच्या उमेदवारांनी समर्थकासह पैठण शहर व वडवाळी गावात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची अतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. यावेळी दूध संघाचे नंदलाल काळे, अरुण पाटील काळे, अशोक बरडे, गणेश पवार, उत्तमराव जाधव, सखाराम शिंदे, बळीराम जाधव, पांडुरंग जाधव, भिमराव गायकवाड, रमेश घोंगडे, रामनाथ घोंगडे, शाम काळे, भगवान मैदड आदी उपस्थित होते. विजयाबद्दल पालकमंत्री संदिपान भुमरे व युवा नेते विलास भुमरे यांनी नवनिर्वाचित सरपंच स्वाती किशोर काळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.