मराठवाड्यातून चौघांनाच मंत्रीपदाची लॉटरी; निलंगेकर, लोणीकर, शिरसाट ‘वेट ॲण्ड वॉच’वर
By नंदकिशोर पाटील | Published: August 10, 2022 05:38 PM2022-08-10T17:38:00+5:302022-08-10T17:40:15+5:30
मराठवाड्यात २६ सत्ताधारी आमदार, सहा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित
औरंगाबाद: राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन प्रतिनिधित्व मिळाले असून उर्वरित सहा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार पुढील विस्तारात संधी मिळेल या आशेवर आहेत. या प्रदेशात भाजपचे सोळा तर शिंदे समर्थक आमदारांची संख्या दहा आहे. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि तानाजी सावंत या चौघांची वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर दुसरीकडे भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांच्यासह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यातील सत्तांतरात मराठवाड्यातील आमदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या मंत्र्यांसह दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात सामील झाले. पैकी भुमरे आणि सत्तार यांना मंत्रिपदाची बक्षिसी मिळाली आहे. संजय शिरसाट यांचा पत्ता ऐनवेळी कसा कटला, या बद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिरसाट यांना कदाचित विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळू शकते.
मराठवाड्यात भाजपचे सोळा आमदार आहेत. पैकी एकमेव अतुल सावे (औरंगाबाद) यांना संधी मिळाली आहे. माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांना कदाचित पुढील विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातून निलंगेकर की अभिमन्यू पवार, असाही भाजपपुढे पेच आहे. कारण दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत (परंडा) यांची वर्णी लागल्याने या जिल्ह्याचा खूप दिवसांचा अनुशेष भरुन निघाला आहे. तर लातूरसह नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि बीड हे सहा जिल्हे मंत्री पदापासून वंचित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर होते. त्यामुळे आ. बालाजी कल्याणकर व आ. संतोष बांगर यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
‘मविआ’त होते सात मंत्री
महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय बनसोडे असे सात जण मंत्री होते.
औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी !
मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी लागली आहे. शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून सावे यांची वर्णी लागली असण्याची शक्यता आहे.
सत्तारांनी मारजी बाजी
टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने त्यांचे मंत्रिपद हुकणार, अशी चर्चा वृत्त वाहिन्यांवर सुरू होती. मात्र, सत्तारांनी मंत्रिपद मिळवून अनेकांना धक्का दिला. सत्तार हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. मंत्रिपद सोडून ते शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी सिल्लोड येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याची बक्षिसी सत्तार यांना मिळाली.