विमानतळाच्या विकासासाठी पर्यटन मंत्रालय सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:29 AM2018-07-05T00:29:54+5:302018-07-05T00:32:09+5:30
देशभरातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेली १२ शहरे हवाई सेवेने जोडण्याची योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आखली असून, उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडान’ योजनेतील या शहरांतील विमानतळांचा विकास प्राधान्याने करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशभरातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेली १२ शहरे हवाई सेवेने जोडण्याची योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आखली असून, उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडान’ योजनेतील या शहरांतील विमानतळांचा विकास प्राधान्याने करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने २०१६ मध्ये विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडाण’ हे धोरण जाहीर केले. यातूनच देशभरातील विविध शहरे हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. यात पर्यटननगरी असलेल्या औरंगाबाद शहराचाही समावेश होता. विविध कंपन्यांची सेवा येथे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचालीही सुरू झालेल्या आहेत. त्यातच केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने ‘बुद्ध सर्किट’ व इतर धार्मिक स्थळे हवाई सेवेने जोडण्याची भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून आग्रा (फतेपूर सिक्री, ताजमहाल), अजिंठा, वेरूळ (औरंगाबाद), कुतुब मीनार, लाल किल्ला (दिल्ली), कोळवा बीच (गोवा), अमेर किल्ला (राजस्थान), सोमनाथ, ढोलवीरा (गुजरात), खजुराहो (मध्यप्रदेश), हम्पी (कर्नाटक), महाबलीपुरम (तामिळनाडू), काजिरंगा (आसाम), कुमाराकोम (केरळ) आणि महाबोधी टेम्पल (बिहार) या स्थळांच्या विमानतळांचा विकास करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने नागरी उड्डयन मंत्रालयाकडे धरला आहे. ही शहरे हवाईसेवेने जोडण्यासह विमानतळांवरील धावपट्टी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पर्यटन मंत्रालयाकडून पाठपुरावा सुरू आहे.
पर्यटन मंत्रालयाने काही धार्मिक स्थळांची निवड केली आहे; पण अशा ठिकाणांची यादी दिली गेली तर या ठिकाणांच्या विकासाचा आराखडा तयार करता येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
देशभरातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत काही बैठका झालेल्या आहेत. विकासाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विमानतळांवरील धावपट्टी व गरजेनुसार इतर प्रकारच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. विमान सेवा कंपन्यांनी कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत सेवा सुरू करावी, त्यांना ‘व्हायामिलिटी गॅप फंडिंग’ दिले जाईल.
तसेच पर्यटन मंत्रालय पर्यटन वाढावे म्हणून विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘उडाण’ या केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या धोरणानुसार दुसऱ्या फेरीत ३६ विमानतळांवर सेवा सुरू आहे. १३ सेवा देण्याच्या तयारीत, तर २९ विमानतळे लवकरच हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. अशा एकूण ७८ विमानतळांचा समावेश हवाई सेवा जोडण्यात होत आहे, तसेच देशभरातील विविध शहरांतील विमानतळांवर ३१ हेलिपॅडस् हे हेलिकॉप्टरद्वारे कनेक्टेड होणार आहेत.
\\\
देशभरातील १२ धार्मिक शहरे हवाई सेवेने जोडण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालय आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाºयांची बैठक झाली असून, विकास केल्या जाणाºया विमानतळांमध्ये औरंगाबादचाही समावेश आहे. हवाई सेवा देणाºया कंपन्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल.
- डी.जी. साळवे, संचालक, विमानतळ, औरंगाबाद.