मारहाणमुळे कॉलेज सोडून अल्पवयीन विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरात: दामिनी पथकाच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा
By राम शिनगारे | Published: June 4, 2023 09:28 PM2023-06-04T21:28:52+5:302023-06-04T21:29:02+5:30
जालना येथील घटना.
छत्रपती संभाजीनगर : जालना शहराजवळील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलास खोलीवर दोन मैत्रिणी आल्यामुळे परिसरातील पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या तिघांनीही जालना सोडून छत्रपती संभाजीनगर गाठले. शनिवारची रात्र रेल्वेस्थानक परिसरात घातली. त्यानंतर कुटुंबियांना संपर्क साधल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दामिनी पथकाला घटनेची माहिती कळविली. दामिनी पथकाने तीन विद्यार्थ्यांना शोधुन काढून मदत केल्याचा प्रकार रविवारी घडला आहे.
जालना-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या एका शासकीय महाविद्यालयात १७ वर्षांचा मुलगा आणि दोन मुली शिक्षण घेतात. मुलगा नांदेड जिल्ह्यातील तर एक मुलगी परभणी तर दुसरी जालना जिल्ह्यातील आहेत. त्यातील एका मुलीसोबत मुलाचे प्रेमसंबंध आहेत. दुसरी मुलगी प्रेमसंबंध असलेल्या मुलीची खास मैत्रीण आहे. त्यामुळे दोघीही मुलाच्या खोलीवर येत-जात होत्या. या प्रकारामुळे परिसरातील पाच ते सहा मुलांनी मुलास तुझ्या खोलीवर मुली कशा काय येतात, असा जाब विचारून बेदम मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या तिघांनी बॅग भरून थेट छत्रपती संभाजीनगर गाठले. रेल्वेस्थानकावर रात्र काढल्यानंतर रविवारी मुलाने कुटुंबियांना फोन करून पैशाची मागणी केली. तेव्हा मुलाच्या मामाने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षातुन दामिनी पथकास पाचारण करण्यात आले. त्यानुसार दामिनी पथकाच्या सहायक फाैजदार लता जाधव, हवालदार कल्पना जाधव आणि चालक मनिषा बनसोडे यांनी मुलांचा शोध सुरू केला.
रेल्वेस्थानक परिसर शोधुन काढल्यानंतर सापडले नाहीत. त्यानंतर माेबाईलच्या लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता, मुले सिद्धार्थ गार्डनमध्ये होते. तेथून त्यांना क्रांतचौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांना धीर देत नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यातील एका मुलीचे नातेवाईक आले होते. उर्वरित दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती दामिनी पथकाने दिली. ही कारवाई निरीक्षक अम्रपाली तायडे, उपनिरीक्षक अनिता फासाटे यांच्या मार्गदर्शनात केली.
पोलिस येताच मुली रडू लागल्या
दोन्ही मुलींना काय करावे हेच समजत नव्हते. जेव्हा पोलिसांनी त्यांना क्रांतीचौक ठाण्यात आणले. तेव्हा त्यांना काहीच सुचत नव्हते. त्या रडतच होत्या. तसेच प्रेमसंबंध असलेली मुलगी मुलास सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे हा प्रकार पाहुन दामिनी पथकासही काही काय करावे हेच सुचेना गेले होते.