अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:50 PM2018-11-03T22:50:31+5:302018-11-03T22:51:52+5:30
घरात घुसून १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणारा आरोपी नारायण फकिरा कानडजे (२६, रा. सिल्लोड) याला विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी शनिवारी (दि. ३) ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : घरात घुसून १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणारा आरोपी नारायण फकिरा कानडजे (२६, रा. सिल्लोड) याला विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी शनिवारी (दि. ३) ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.
४ नोव्हेंबर २०१५ रोजी त्या मुलीचे आई-वडील सुरत येथील वीटभट्टीवर कामाला गेले होते. त्यामुळे पीडिता व तिची छोटी बहीण घरी होत्या. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी परीक्षा लवकर संपल्याने पीडिता एकटीच घरी आली होती. ही संधी साधत आरोपी नारायण कानडजे हा तिच्या घरात शिरला. त्याने तिचा हात धरून लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडितेने घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला पकडले. त्या झटापटीत तिचे कपडे फाटले. मुलीने आरडा-ओरड केल्याने शेजारी राहणारी महिला तिच्या घरी धावत आली. हे पाहून आरोपी तेथून पळून गेला होता. अजिंठा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. शिंदे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडिता, तिच्या शेजारी राहणारी महिला व शाळेच्या मुख्याध्यापिका यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी नारायण कानडजे याला ‘पोक्सो’ कायद्याचे कलम ८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला, तसेच कलम ४५२ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, कलम ३५४ (ब) अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, कलम ३५४ (अ) अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
-----------