अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 07:38 PM2018-10-24T19:38:36+5:302018-10-24T19:39:29+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली आरोपी आकाश सुनील कांबळे याला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी आरोपी आकाश सुनील कांबळे याला मंगळवारी (दि. २३) तीन वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात पीडित मुलीने फिर्याद दिली होती. त्यानुसार घटनेपूर्वी आठ-नऊ महिन्यांपासून आरोपी आकाश सुनील कांबळे (२३, रा. भावसिंगपुरा) हा तिचा पाठलाग करून वारंवार छेड काढत होता. तिचा स्कार्फ ओढून आरोपीने तिला धमक्याही दिल्या होत्या. त्याला घाबरून मुलगी दोन महिने शाळेत गेली नव्हती. याला कंटाळून मुलीने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, मामा, मुख्याध्यापक आदींची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणी अंती न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ (ब) अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला.
तसेच कलम ३५४ (ड) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, त्याचप्रमाणे कलम ५०६ अन्वये सहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड ठोठावला. तसेच पोस्को कायद्याच्या कलम ११ आणि १२ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. या गुन्ह्यातील आरोपी आकाश याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांपासून तडीपार करण्यात आले होते. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही दखल न्यायालयाने निकाल देताना घेतली.