अल्पवयीन मुलीला खोलीत डांबून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:53 PM2019-04-08T17:53:13+5:302019-04-08T17:55:15+5:30
कन्नडमार्गे धुळ्याकडे पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले
औरंगाबाद : सोळावर्षीय तरुणीला मित्राच्या खोलीत डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना पुंडलिकनगर परिसरात घडली. आरोपीच्या तावडीतून सुटका करून घरी परतलेल्या तरुणीने वडिलांसह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत कन्नड तालुक्यातील रिठ्ठी मोढा येथे नराधमासह त्याच्या मित्राला पकडले.
नंदू ऊर्फ अनिल शेषराव शेलार (रा. हुसेन कॉलनी) आणि प्रकाश रतन साप्ते (रा. पुंडलिकनगर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सोळावर्षीय तरुणी गतवर्षी दहावी नापास झाल्याने घरीच होती. आरोपी नंदू ऊर्फ अनिल शेलारच्या मित्राची ती मैत्रीण आहे. मित्रामुळे तिच्यासोबत काही दिवसांपूर्वी नंदूची ओळख झाली, तेव्हापासून नंदू तिच्या संपर्कात होता. दोघे आपसात बोलत, मात्र नंदूची तिच्यावर वाईट नजर असल्याचे तिला कधी समजलेच नाही.
२७ मार्च रोजी तो तिला घेऊन मित्र प्रकाश साक्षेच्या खोलीवर गेला. तिला जिवे मारण्याची धमकी देत डांबून ठेवले. तिसऱ्या दिवशी रात्री नंदू तिला हुसेन कॉलनीतील समीर पटेल याच्या गच्चीवर घेऊन गेला आणि अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी परत प्रकाशच्या खोलीत आणून डांबले. ४ एप्रिल रोजी नंदूने पुन्हा पीडितेवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी तो बाहेरगावी जायचे असल्याचे सांगून निघून गेला. तिला मात्र खोलीबाहेर जाऊ देऊ नको असे प्रकाशला सांगितले. प्रकाशची नजर चुकवून तिने खोलीतून धूम ठोकली.
वडिलांसह घेतली पोलीस ठाण्यात धाव
मुलगी घरातून गायब झाल्यामुळे चिंताग्रस्त आई-वडील तिचा शोध घेत असताना ७ एप्रिल रोजी ती घरी आली आणि रडतच तिने आई-बाबांना तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. या प्रकारानंतर तिला सोबत घेऊन वडील थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आले. तेथे त्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.
आरोपी जाणार होते कन्नड, धुळेमार्गे पुण्याला
तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सपोनि सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी बाळाराम चौरे, राजेश यदमळ, रवी जाधव, जालिंदर मांटे, इम्रान अत्तार, विलास डोईफोडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी हे कन्नड तालुक्यातील रिठ्ठी मोढा येथे मित्राकडे असल्याचे समजले. पोलिसांनी मोढा येथे जाऊन त्यांना पकडले. मित्राकडून पैसे घेऊन ते हे धुळेमार्गे पुण्याला पळून जाणार होते.