निम्मे बालमृत्यू अतिसाराने !
By Admin | Published: July 19, 2015 12:25 AM2015-07-19T00:25:15+5:302015-07-19T00:25:15+5:30
संजय तिपाले , बीड जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.
संजय तिपाले , बीड
जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून अडीच लाख बालकांना मोफत ‘ओआरएस’ (अतिसार प्रतिबंधक पावडर) देण्याची मोहीम उघडली आहे. सोबतच मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी मातांना आशा सेविकांमार्फत धडे दिले जाणार आहेत.
२७ जुलै ते ८ आॅगस्ट या दरम्यान ‘अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ राबविला जात आहे. पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी ‘डोअर टू डोअर’ जाणार आहेत. प्रत्येक बालकांना मोफत ओआरएस दिले जाणार आहे. ओआरएसचे द्रावण कसे तयार करायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.
अतिसाराची लागण झालेल्या बालकांना झिंक गोळी देण्यात येणार आहे. सर्वेक्षणातून एकही बालक सुटू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी ‘हात धुवा’ मोहीम राबविणार आहेत. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ते स्वच्छतेबाबत टिप्स देणार असून त्यांनाही यासंदर्भात सूचना दिल्याचे वडगावे म्हणाले.
मातांना समूपदेशन
सर्वेक्षणावेळी आशा स्वयंसेविका मातांचे समूपदेशन करणार आहेत. स्तनपानाचे महत्त्व, ६ महिन्यानंतर बाळाला द्यावयाच्या अन्नाबाबतही माहिती दिली जाणार आहे. खीर, पराठा, मुगदाळ, खीर हे पदार्थ लाभदायक असून स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आवाहन डॉ. वडगावे यांनी केले आहे.
अशी घ्या काळजी!
बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले की, पावसाळ्यात बालकांमध्ये अतिसार होण्याची दाट शक्यता असते. गेल्या काही दिवसांत अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. उघड्यावरील अन्न मुलांना देणे टाळावे, शौचानंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी उकळून प्यावे, असा सल्ला दिला.
कोवळ्या जिवांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाने अतिसार नियंत्रणासाठी पंधरा दिवसांची मोहीम उघडली आहे. त्यापूर्वीच बालकांमध्ये अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिसार, उलट्यांमुळे अनेक बालके त्रस्त असून दवाखान्यांमध्ये गर्दी वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.