अल्पवयीन मुलाने चोरली मित्राच्या घरातून दोन लाखांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:02 AM2021-07-28T04:02:27+5:302021-07-28T04:02:27+5:30

औरंगाबाद : घराशेजारी राहणाऱ्या मित्राच्या घरातून अल्पवयीन मुलानेच दोन लाख रुपयांची रोकड चोरल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. ...

A minor stole Rs 2 lakh cash from a friend's house | अल्पवयीन मुलाने चोरली मित्राच्या घरातून दोन लाखांची रोकड

अल्पवयीन मुलाने चोरली मित्राच्या घरातून दोन लाखांची रोकड

googlenewsNext

औरंगाबाद : घराशेजारी राहणाऱ्या मित्राच्या घरातून अल्पवयीन मुलानेच दोन लाख रुपयांची रोकड चोरल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. १४ जुलै रोजी ही बाब समोर आल्यावर तक्रारदार यांनी दहा ते बारा दिवसांत पैसे परत करण्यासाठी मुलाच्या नातेवाईकांना केलेली विनंती व्यर्थ गेल्याने शेवटी त्यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

तक्रारदार नारायण रंगनाथ अल्हाड (रा. सिडको) यांना त्यांच्या मुलाच्या कोचिंग क्लासची फी भरायची होती. शिवाय फ्लॅट खरेदी करायचा असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन लाख रुपये जमा करून घरातील कपाटात ठेवले होते. त्यांच्या घराशेजारी राहणारा संशयित १५ वर्षांचा मुलगा त्यांच्या मुलाचा मित्र आहे. त्याचे तक्रारदार यांच्या घरात येणे - जाणे असायचे. त्यांच्या घरात पैसे असल्याचे त्याने पाहिले हाेते. ही रक्कम चोरण्याच्या उद्देशाने काही दिवसांपूर्वी त्याने किचनमधून घर आणि आलमारीची चावी चोरली. १३ जुलै रोजी तक्रारदार हे गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी ते गावाहून परतले. तेव्हा त्यांना कपाटातील २ लाखांची रोकड चोरी झाल्याचे दिसले. दरवाजाचे कुलूप जैसे थे होते. शिवाय कपाटाचेही नुकसान न करता ही चोरी झाल्याने ते आश्चर्यचकीत झाले होते. ही चोरी जवळच्या व्यक्तीनेच केल्याचा त्यांना संशय आला होता. यामुळे ही चोरी कोणी केली असावी, याविषयी ते शेजाऱ्यांकडे विचारपूस करीत असताना संशयित १५ वर्षीय मुलाजवळ भरपूर नोटा पाहिल्याचे एका जणाने त्यांना सांगितले. यानंतर तक्रारदार यांचा संशय बळावला आणि त्यांनी त्या मुलाच्या नातेवाईकांकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यांना पैसे परत करण्याची तयारी दर्शवित धनादेश दिला. मात्र, यानंतरही त्यांना रक्कम दिली नाही. शेवटी नारायण यांनी सिडको पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे तपास करीत आहेत.

Web Title: A minor stole Rs 2 lakh cash from a friend's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.